‘रणरागिणी’ संघटनेचा प्रश्न !
मुंबई – मंदिरातील ही वस्त्रसंहिता केवळ महिलांना लागू करण्यात आलेली नसून ती सर्वांसाठीच लागू करण्यात आलेली आहे. त्यामुळे अधिवक्ता गुणरत्न सदावर्ते यांची मुलगी झेन सदावर्ते यांनी ‘महिलांवर अन्याय’ झाल्याची महिला आयोगाकडे केलेली तक्रार, हा निवळ अपप्रचार आहे. झेन सदावर्ते यांचे आई-वडील हे अधिवक्ता असून त्यांना न्यायालयातील इंग्रजाळलेला अधिवक्त्यांचा ‘ड्रेसकोड’ अर्थात् काळा वकिली पेहराव घालण्याची सक्ती चालत असेल, तर मुंबईतील श्री सिद्धिविनायक मंदिरातील वस्त्रसंहितेवरच आक्षेप का ? काळ्या वकिली पेहराव घालण्याची सक्ती उठवा, अशी मागणी वा तक्रार सदावर्ते यांनी न्यायालयात कधी केली आहे का ?, असा प्रश्न हिंदु जनजागृती समितीच्या ‘रणरागिणी’ शाखेच्या सुश्री प्रतीक्षा कोरगावकर यांनी केला आहे. सुप्रसिद्ध श्री सिद्धीविनायक मंदिरात वस्त्रसंहिता (‘ड्रेसकोड’) लागू करण्याचा अत्यंत स्तुत्य निर्णय मंदिर प्रशासनाने घेतला आहे. त्याचे महाराष्ट्रातील समस्त मंदिरांच्या वतीने आम्ही स्वागत करतो आणि त्याला पूर्ण पाठिंबा घोषित करतो, असेही त्यांनी त्यांच्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, मंदिरेच नव्हे, तर देशभरातील मशिदी, चर्च, गुरुद्वारा आदी धार्मिक स्थळांमध्ये वस्त्रसंहिता आहे. न्यायालय, पोलीस, रुग्णालय, शाळा, शासकीय कार्यालये या सर्वच ठिकाणी वस्त्रसंहिता लागू आहे. त्यामुळे केवळ मंदिरामध्ये महिलांवर बंधने आणली जात आहेत, हा आक्षेप चुकीचा आहे. हवाई सुंदरींना अल्प कपडे घालून अंगप्रदर्शन करण्यास भाग पाडले जाते. याविषयी कुणाला आक्षेप वाटत नाही वा कुणी तक्रार करत नाही; मात्र मंदिरात संस्कृतीपालनासाठी सर्वांसाठी केलेल्या नियमांवर आक्षेप घेतला जाणे निंदनीय आहे. मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे, हे ‘व्यक्तीस्वातंत्र्य’ असू शकत नाही. प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत, याचे व्यक्तीस्वातंत्र्य आहे; मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे. तेथील भावभक्तीमय वातावरण आणि पावित्र्य यांना समोर ठेवूनच आचरण व्हायला हवे. तेथे व्यक्तीस्वातंत्र्य नव्हे, तर धर्माचरणाला महत्त्व आहे. त्यामुळे मंदिरामध्ये भाविकांनी येतांना अंगप्रदर्शन करणारे, उत्तेजक तथा तोकडे कपडे घालून येऊ नये, असे आवाहन जर मंदिर प्रशासन करते, त्यात चुकीचे काहीच नाही.
वस्त्रसंहिता मंदिरांप्रमाणेच चर्च आणि मशिदी येथेही लागू आहेच; मग कधी या विरोधात सदावर्ते यांनी आवाज उठवला आहे का ? मद्रास उच्च न्यायालयानेही ‘तेथील मंदिरांत प्रवेश करण्यासाठी सात्त्विक वेशभूषा असली पाहिजे’, हे मान्य करून १ जानेवारी २०१६ पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली, असेही सुश्री प्रतीक्षा कोरगावकर यांनी म्हटले आहे.
संपादकीय भूमिका :अल्प कपडे घालणार्या हवाईसुंदरींना नव्हे, तर मंदिरातील वस्त्रसंहितेच्या नियमांविषयी आक्षेप घेतला जाणे निंदनीय ! |