४ – ५ जागांची शक्यता असतांना राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४२ जागा मिळणे यावर विश्‍वास बसेल का ? – राज ठाकरे, मनसे

अजित पवारांचा १ खासदार निवडून आला असतांना, तिथे ४२ आमदार निवडून आले; यावर विश्वास कसा ठेवायचा : राज ठाकरे

मुंबई : विधानसभा निवडणूक निकालातील अनेक असे निर्णय आहेत, ज्‍यावर विश्‍वासच बसत नाही. काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात सात वेळा आमदार झाले. ते सात वेळा ७० ते ८० सहस्र मताधिक्‍यांनी निवडून यायचे. त्‍यांचा १० सहस्र मतांनी पराभव झाला. ‘४ – ५ जागा येतील कि नाही’, असे वाटत असतांनाच राष्‍ट्रवादी काँग्रेस पक्षाला ४२ जागा मिळाल्‍या, यावर कुणाचा विश्‍वास बसेल का ? जे निवडून आले आणि सत्तेत आहेत, त्‍यांचे मला संपर्क आले, त्‍यांनाही धक्‍का बसला आहे. राजकारणाचा चिखल झाला आहे, त्‍यात तुम्‍ही जागरूक राहिले पाहिजे, असे विधान मनसेचे अध्‍यक्ष राज ठाकरे यांनी केले आहे. ते मुंबईतील मेळाव्‍यामध्‍ये बोलत होते. विधानसभा निवडणुकीमध्‍ये महायुतीचा विजय झाला आणि महाविकास आघाडी, तसेच मनसे या पक्षांना हार पत्‍करावी लागली त्‍या वेळी राज ठाकरे यांनी भाष्‍य केले नव्‍हते.

ते पुढे म्‍हणाले, ‘‘जे इतकी वर्षे महाराष्‍ट्रामध्‍ये राजकारण करत आले, ज्‍यांच्‍या जिवावर अजित पवार, छगन भुजबळ मोठे झाले, त्‍या शरद पवारांना १० जागा मिळतात. ही न समजण्‍यापलीकडची गोष्‍ट आहे. ४ महिन्‍यांपूर्वी झालेल्‍या लोकसभा निवडणुकीला काँग्रेसचे सर्वाधिक १३ खासदार निवडून आले. एका खासदाराखाली साधारण ६ आमदार येतात, सर्वसाधारपणे काँग्रेसचे ३ खासदार यायला पाहिजे होते. त्‍यांचे १५ आमदार आले. शरद पवारांचे ८ खासदार निवडून आले; पण त्‍यांचे विधानसभेत १० आमदार आले. लोकसभेला अजित पवारांचा १ खासदार निवडून आला, तिथे ४२ आमदार निवडून आले. ४ महिन्‍यात लोकांच्‍या मनात फरक पडला का ? हा संशोधनाचा विषय आहे. तुम्‍ही कुठेही मनात धरू नका की, लोकांनी मतदान केलेले नाही, लोकांनी केलेले मतदान गायब झाले. अशा प्रकारच्‍या निवडणुका लढवायच्‍या असतील, तर निवडणुका न लढवलेल्‍या बर्‍या ! ’’