संतोष देशमुख खून प्रकरणी मुंबईत मोर्चा

मुंबई – वाल्मिक कराडला सगळे का घाबरतात ? त्याच्याकडे कुणाचे व्हिडिओ आहेत का ? माझ्या माहितीनुसार तो आरामात रुग्णालयात झोपला आहे. आता त्याला मोठे आजार होतील आणि तो मस्त आराम करेल. बीडच्या शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागातील सर्व खाटा रिकाम्या केल्या आहेत. असे आहे, तर त्यापेक्षा त्यालाच सोडून द्या, असे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड म्हणाले. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख, तसेच सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळण्याच्या उद्देशाने येथे मोर्च्याचे आयोजन करण्यात आले होते. सूर्यवंशी यांना श्वासाचा विकार नव्हता, असे त्यांच्या कुटुंबियांनी सांगितले. त्यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. त्याच्या आईने सरकारचे १० लाख रुपयेही परत पाठवले, असे ते या वेळी म्हणाले.
मुंबईचे पोलीस काय करू शकतात, हे दाऊदला चांगले ठाऊक आहे; म्हणून तो दुबईला जाऊन बसला आहे. गेल्या ५ वर्षांत सत्ताधार्यांनी पोलीस खात्याची अपकीर्ती केली आहे. खर्या आरोपीला सोडण्यासाठी अक्षय शिंदे याला चकमकीत ठार करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी या वेळी केला.
एक-दोन लोकांमुळे वंजारी समाजाची अपकीर्ती होत आहे. ४० आयपीएस् अधिकारी ही वंजारी समाजाची ओळख आहे. ८० टक्के हमाल वंजारी समाज आहे. अत्याचार झाला, तिथे मूठ आवळून उभे रहा, असेही आव्हाड या वेळी म्हणाले.
देशमुख यांच्या खुनाप्रकरणी कराड यांच्या आजारपणाविषयी संशय व्यक्त करणार्या अंजली दमानिया यांनी ‘मला भ्रमणभाषवरून धमकी देण्यात आली आहे’, असे ‘एक्स’वर म्हटले आहे. |