Firing On Hindu Sena president : हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता यांच्यावर गोळीबार : थोडक्यात बचावले !

अजमेर दर्गा शिवमंदिर असल्याचे प्रकरण

हिंदु सेनेचे अध्यक्ष विष्णु गुप्ता

अजमेर (राजस्थान) – हिंदु सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष विष्णु गुप्ता यांच्यावर येथे गोळीबार करण्यात आल्याची घटना २५ जानेवारीच्या सकाळी ६ वाजता घडली. विष्णु गुप्ता यांनी अजमेरच्या चिश्ती दर्ग्याच्या ठिकाणी हिंदु मंदिर असल्याच्या संदर्भात येथील न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली आहे. या याचिकेवर २४ जानेवारीला सुनावणी झाली होती. त्यानंतर ते देहली येथे जात असतांना गगवाना-लाडपुरा येथे दुचाकीवरून आलेल्या २ अज्ञातांनी त्यांच्या चारचाकी वाहनावर गोळीबार केला आणि ते पळून गेले. विष्णु गुप्ता यांच्या वाहनाला गोळ्या लागल्या. यात विष्णु गुप्ता बचावले. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा नोंदवला आहे. या घटनेनंतर विष्णु गुप्ता म्हणाले की, माझ्या सुरक्षेला या आधीच धोका आहे.  मला ठार मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. हे आक्रमण घाबरवण्यासाठी करण्यात आले आहे; पण मी घाबरणार नाही.

पोलिसांनी गुन्हेगारांची ओळख पटवण्यासाठी जवळच्या सीसीटीव्ही चित्रीकरणाची तपासणी करत आहेत. ‘लवकरच गुन्हेगारांना अटक केली जाईल आणि प्रकरणाचा उलगडा होईल’, असे पोलिसांनी म्हटले आहे.

विष्णु गुप्ता यांच्या अधिवक्त्यांना ठार मारण्याची धमकी

अजमेर दर्ग्यात शिवमंदिर असल्याचा दावा करणार्‍या याचिकेवर २४ जानेवारीला न्यायालयात सुनावणी झाली. यापूर्वी ‘२४ जानेवारीला सुनावणीसाठी न्यायालयात आल्यास गोळ्या घालून ठार मारण्यात येईल’, अशी धमकी विष्णु गुप्ता यांच्या अधिवक्त्यांना न्यायालयाबाहेर एकाने दिली. त्याने स्वतःला पत्रकार असल्याचे सांगितले होते.

दर्गा समितीला म्हणणे मांडण्याची देण्यात आला वेळ

याचिकाकर्ते विष्णु गुप्ता यांच्या याचिकेवर दर्गा समितीने न्यायालयात याचिका प्रविष्ट केली आहे. या याचिकेत त्यांनी शिवमंदिर असल्याचा दावा करणारी याचिका फेटाळण्याची मागणी केली आहे. समितीचे म्हणणे आहे की, ही याचिका सुनावणीसाठी योग्य नाही. यावर न्यायालयाने विष्णु गुप्ता यांच्याकडून उत्तर मागितले. विष्णु गुप्ता यांनी न्यायालयात त्यांचे उत्तर सादर केले आहे. आता दर्गा समितीला या उत्तरावर बाजू मांडायची आहे, ज्यासाठी त्यांनी न्यायालयाकडून वेळ मागितला आहे. या प्रकरणात पक्षकार होण्यासाठी ६ नवीन लोकांनी अर्ज दाखल केला आहे. आतापर्यंत एकूण ११ जणांनी या प्रकरणात पक्षकार होण्याची मागणी केली आहे.

विष्णु गुप्ता म्हणाले की, अजमेर दर्ग्यात मंदिराच्या अस्तित्वाबाबत न्यायालयासमोर अनेक पुरावे सादर केले आहेत. येथे पूजा स्थळ कायदा (प्लेसेस ऑफ वर्शिप अ‍ॅक्ट) लागू होत नाही; कारण ते प्रार्थनास्थळ नाही. केवळ मंदिरे, मशिदी, चर्च आणि गुरुद्वारा हे पूजा कायद्यांतर्गत येतात. पूजा कायद्यात दर्गा किंवा कब्रस्तान यांचा उल्लेख नाही.

संपादकीय भूमिका

  • न्यायालयीन लढाई लढू न पहाणारे अशा प्रकारचे कृत्य करू पहात आहेत. असे झाले, तरी हिंदू त्यांची लढाई थांबवणार नाहीत, हे हिंदूंनी संघटित होऊन एकमुखाने सांगितले पाहिजे !
  • राजस्थानमध्ये भाजपचे सरकार असल्यामुळे तेथे अशी घटना घडू नये, असेच हिंदूंना वाटते !