हिंदुत्वाच्या रक्षणासाठी सरकार कटीबद्ध ! – नितेश राणे, मंत्री, मत्स्यव्यवसाय आणि बंदर, महाराष्ट्र राज्य

आळंदी (पुणे) येथील सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित ‘हिंदु महोत्सव २०२५’ !

महाराष्ट्र राज्याचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाचे मंत्री श्री. नितेश राणे यांना निवेदन देताना हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले आणि श्री. श्रीकांत बोराटे

आळंदी (जिल्हा पुणे), २३ जानेवारी (वार्ता.) – आज हिंदु धर्मावर वक्फ बोर्ड, लव्ह जिहाद, धर्मांतर, तसेच देवतांचा अवमान अशा प्रकारचे आघात होत आहेत. हिंदुत्वाचे कार्य करणारे कार्यकर्ते आणि संघटना यांनीच केवळ धर्मरक्षणाचे काम करून उपयोग नाही, तर प्रत्येक हिंदूने आता धर्माच्या रक्षणासाठी पुढे आले पाहिजे. आताचे सरकार हिंदुत्वनिष्ठ विचाराचे असून हिंदुत्वाच्या रक्षणासाठी कटीबद्ध आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे मत्स्यव्यवसाय आणि बंदर विभागाचे मंत्री श्री. नितेश राणे यांनी केले. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदूंवर होणारी दडपशाही खपवून न घेता आता वर्षातून ३६५ दिवस हिंदु राष्ट्र म्हणून साजरे झाले पाहिजे, असेही मत श्री. नितेश राणे यांनी व्यक्त केले. समाज प्रबोधनकार ह.भ.प. श्री. संग्राम बापू भंडारे, तसेच मोशी येथील युवा नेते श्री. नीलेशशेठ बोराटे यांनी श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्याच्या वर्धापनदिनाच्या निमित्त सकल हिंदु समाजाच्या वतीने आळंदी येथील फ्रूटवाले धर्मशाळेच्या प्रांगणात ‘हिंदु महोत्सव २०२५’ कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी उपस्थित हिंदुत्वनिष्ठ आणि धर्माभिमानी यांना मार्गदर्शन करतांना श्री. नितेश राणे यांनी वरील प्रतिपादन केले.

श्री. नीलेश बोराटे यांची सदिच्छा भेट घेताना समितीचे कार्यकर्ते

ह.भ.प. सुप्रियाताई साठे, श्री. ज्ञानेश्‍वर बनसोडे, श्री. रविदादा पडवळ, श्री. संतोष लोखंडे, श्री. गणेश गरुड या वक्त्यांचेही या वेळी मार्गदर्शन झाले.
या वेळी मुख्यमंत्री वैद्यकीय कक्षाचे प्रमुख श्री. मंगेश चिवटे, ‘टायगर ग्रुप’चे अध्यक्ष श्री. तानाजी जाधव, शिवभक्त श्री. अनिकेत घुले, ‘महाराष्ट्र कृषी गोसेवा संघा’चे श्री. मिलिंदभाऊ एकबोटे, हिंदुत्वनिष्ठ श्री. सागरभाऊ बेग, हिंदुत्वनिष्ठ श्री. कुणाल साठे, तसेच आळंदी येथील विविध वारकरी शिक्षण संस्थेचे प्रमुख, कीर्तनकार, प्रवचनकार आणि हिंदु बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचा आरंभ दीपप्रज्वलन करून आणि सांगता प्रभु श्रीरामाची महाआरती करून करण्यात आली.

श्रीराम संघाचे आणि प्रखर हिंदुत्वनिष्ठ श्री. सागर बेग (डावीकडून पहिले) यांची भेट घेतांना श्री. श्रीकांत बोराटे आणि हिंदु जनजागृती समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने निवेदन !

बांगलादेशामध्ये हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांच्या विरोधात भारत सरकारने पावले उचलावीत, तसेच भारतात अवैधपणे रहाणारे बांगलादेशी घुसखोर यांवर कारवाई करावी, या मागणीचे निवेदन मंत्री श्री. नितेश राणे यांना देण्यात आले. हे निवेदन समितीच्या वतीने समितीचे पुणे जिल्हा समन्वयक श्री. पराग गोखले आणि प्रा. श्रीकांत बोराटे यांच्या हस्ते देण्यात आले. तसेच विविध क्षेत्रांत हिंदुत्वाचे कार्य करणार्‍या हिंदुत्वनिष्ठांची सदिच्छा भेट घेण्यात आली.