‘महर्षींच्या आज्ञेने सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात २८ ते ३०.५.२०२४ या कालावधीत ‘नवचंडी याग’ करण्यात आला. ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचा महामृत्यूयोग टळून त्यांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, साधकांचे शारीरिक, मानसिक अन् आध्यात्मिक त्रास दूर व्हावेत आणि हिंदु राष्ट्राची स्थापना लवकरात लवकर व्हावी’, या उद्देशाने हा याग करण्यात आला. नवचंडी यागाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. ‘नवचंडी यागाचा पूजेतील घटक, तसेच यागाला उपस्थित साधक आणि संत यांच्यावर काय परिणाम होतो ?’, हे विज्ञानाद्वारे अभ्यासण्यासाठी ‘महर्षि अध्यात्म विश्वविद्यालया’च्या वतीने एक चाचणी करण्यात आली. या चाचणीसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करण्यात आला. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.

१. चाचणीचे स्वरूप
यागाच्या पहिल्या दिवशी (२८.५.२०२४ या दिवशी) यागापूर्वी आणि यागानंतर यागाचे पुरोहित, यागाला उपस्थित साधिका अन् सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर यांची छायाचित्रे काढून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या.
पहिल्या दिवशी यागापूर्वी (२८.५.२०२४ या दिवशी) आणि तिसर्या दिवशी (३०.५.२०२४ या दिवशी) यागानंतर यागातील पूजेच्या मांडणीतील घटक, तसेच श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची छायाचित्रे काढून त्यांच्या चाचण्या करण्यात आल्या. यागाच्या तीनही दिवशी यज्ञकुंडातून निघणार्या धुराच्याही चाचण्या करण्यात आल्या.

वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |
२. चाचणीतील नोंदींचे विवेचन
टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासाठी चाचणीस्थळी अधिकाधिक ३० मीटर एवढीच जागा उपलब्ध होती. त्यामुळे त्यापुढे अचूक प्रभावळ मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.
२ अ. यागाचे पुरोहित, यागाला उपस्थित साधिका आणि बालसंत या सर्वांवर नवचंडीयागाचा सकारात्मक परिणाम होणे : यागानंतर पुरोहित आणि यागाला उपस्थित साधिका यांच्यातील नकारात्मक ऊर्जा अल्प किंवा नाहीशी होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. यागानंतर पू. वामन राजंदेकर यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
२ आ. यागानंतर पूजेतील घटक, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत (चैतन्यात) पुष्कळ वाढ होणे : पूजेतील घटक आणि संतद्वयी यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागानंतर सर्वांतील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ वाढ झाली. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
२ इ. यज्ञकुंडातून निघणार्या धुरातील चैतन्यात उत्तराेत्तर वाढ होणे : यज्ञकुंडातून निघणार्या धुरात नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. यागाच्या पहिल्या दिवशी धुरातील सकारात्मक ऊर्जा ५९० मीटर होती. यागाच्या तिसर्या (शेवटच्या) दिवशी धुरातील सकारात्मक ऊर्जा २२३० मीटर झाली. महापूर्णाहुतीच्या धुरातील सकारात्मक ऊर्जा ३०८० मीटर, म्हणजे सर्वाधिक आहे. त्यांच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
३. चाचणीतील निरीक्षणांचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. श्री दुर्गादेवीचे चित्र आणि मूर्ती यांच्यामध्ये देवीचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट होणे : ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती एकत्र असतात’, हा अध्यात्मातील सिद्धांत आहे. त्यानुसार जेथे देवीचे चित्र किंवा मूर्ती (रूप) आहे, तेथे तिची शक्ती (चैतन्य) असते. यागापूर्वीही श्री दुर्गादेवीचे चित्र आणि मूर्ती यांच्यात पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. चंडी हे दुर्गादेवीचे एक रूप आहे. नवचंडी यागाच्या वेळी पूजेतील मांडणीत ठेवलेले श्री दुर्गादेवीचे चित्र आणि तिची मूर्ती यांच्यात देवीचे तत्त्व (चैतन्य) आकृष्ट झाले. त्यामुळे यागानंतर श्री दुर्गादेवीचे चित्र आणि मूर्ती यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाल्याचे दिसून आले.

३ आ. नवचंडी यागातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित होणे : यज्ञकुंडातून निघणार्या धुरात उत्तरोत्तर अधिक प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून नवचंडी यागातून वातावरणात पुष्कळ प्रमाणात चैतन्य प्रक्षेपित झाले, असे लक्षात येते.
३ इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ होणे : महर्षींच्या आज्ञेने यागाच्या ठिकाणी केलेल्या पूजेच्या मांडणीत सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांचे छायाचित्र ठेवण्यात येते. यागाच्या संकल्पामध्ये सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांना आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य लाभावे, हाही एक प्रमुख उद्देश होता. यागातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा चांगला परिणाम सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या छायाचित्रावर झाला. त्यामुळे यागानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या छायाचित्रातील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले.
३ ई. श्री. सिद्धेश करंदीकर यांनी यागाचे पौरोहित्य भावपूर्ण केले. त्यांनी यागातून प्रक्षेपित झालेले चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा न्यून होऊन त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली.
३ उ. श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्यातील चैतन्यात वाढ होणे : नवचंडी यागाला श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची वंदनीय उपस्थिती लाभली. या संतद्वयी देवीस्वरूप आहेत. नवचंडी यागाच्या वेळी श्री दुर्गादेवीचे तत्त्व (चैतन्य) संतद्वयींमध्ये त्यांच्या कार्यानुरूप आकृष्ट होऊन कार्यरत झाले. त्यामुळे यागानंतर दोघींतील सकारात्मक ऊर्जेच्या प्रभावळीत पुष्कळ वाढ झाल्याचे दिसून आले.
३ ऊ. यागाला उपस्थित साधिका आणि बालसंत यांच्यावर नवचंडी यागाचा सकारात्मक परिणाम होणे : नवचंडी यागाला उपस्थित साधिकांनी त्यांच्या क्षमतेनुसार यागातील चैतन्य ग्रहण केले. त्यामुळे त्यांच्यातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जेत वाढ झाली. यागाला सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन राजंदेकर हेही उपस्थित होते. त्यांनी यागातील चैतन्य ग्रहण केल्याने त्यांच्यातील सकारात्मक ऊर्जा पुष्कळ वाढली.
थोडक्यात सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या जन्मोत्सवानिमित्त करण्यात आलेल्या नवचंडी यागाचा यागातील घटक, तसेच यागाला उपस्थित साधक आणि संत या सर्वांवर सकारात्मक परिणाम झाला.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (२.१२.२०२४)
ई-मेल : mav.research2014@gmail.com