‘आपल्याकडे घरोघरी सायंकाळी देवापुढे दिवा लावल्यानंतर ‘शुभं करोति’सह श्रीरामरक्षास्तोत्र आणि श्री मारुतिस्तोत्र म्हणण्याचा परिपाठ आहे. रामरक्षास्तोत्र बुधकौशिकऋषींनी रचले आहे. आत्मज्ञानसंपन्न ऋषिमुनी अन् साधूसंत यांना हे वाङ्मय परावाणीतून स्फुरत असते. या अवस्थेत त्यांचे ईश्वराशी पूर्ण अद्वैत असल्याने आणि ईश्वरच या सार्याचा कर्ता आहे, या अनुभूतीमुळे ‘रामरक्षा श्री शिवांनी स्वप्नावस्थेत सांगितली’ असे बुधकौशिकऋषींनी लिहिलेले आढळते.
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले हे प्रतिदिन एका संतांनी सांगितल्यानुसार स्वतःच्या प्रकृतीस्वास्थासाठी उपाय म्हणून श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करतात. ‘श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्याने सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांवर काय परिणाम होतो?’, हे अभ्यासण्यासाठी एक चाचणी करण्यात आली. या चाचणीत तुलनेसाठी म्हणून एका साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्याने त्याच्यावर काय परिणाम होतो ?, हेही अभ्यासण्यात आले. या संशोधनात्मक चाचण्यांसाठी ‘यू.ए.एस्. (युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर)’ हे उपकरण आणि लोलक यांचा उपयोग करण्यात आला. ‘युनिव्हर्सल ऑरा स्कॅनर’ आणि लोलक यांच्याद्वारे वस्तू, वास्तू अन् व्यक्ती यांच्यातील सकारात्मक आणि नकारात्मक ऊर्जा मोजता येतात.
टीप – ‘यू.ए.एस्.’ या उपकरणाद्वारे प्रभावळ मोजण्यासाठी चाचणीस्थळी अधिकाधिक ३० मीटर एवढीच जागा उपलब्ध होती. त्यामुळे अचूक प्रभावळ मोजण्यासाठी लोलकाचा उपयोग करण्यात आला.
१. चाचण्यांतील नोंदींचे विवेचन
प्रयोगातील पहिल्या दिवशी (२६.१०.२०२४ या दिवशी) सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी त्यांच्या खोलीत श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केले. प्रयोगातील दुसर्या दिवशी (२७.१०.२०२४ या दिवशी) एका साधकाने आश्रमातील ध्यानमंदिरात श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केले. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण करण्यापूर्वी आणि पठण केल्यानंतर दोघांच्या (छायाचित्रांच्या) ‘यू.ए.एस्.’ उपकरणाद्वारे चाचण्या करण्यात आल्या. ‘संत आणि साधक यांनी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर श्रीरामाच्या चित्रात, तसेच त्या समोर लावलेल्या उद्बत्तीच्या विभूतीवर काय परिणाम होतो ?’, हेही अभ्यासण्यात आले. प्रयोगातील दोन्ही दिवशी श्रीरामाचे तेच चित्र उपयोगात आणले होते. श्रीरामाचे चित्र आणि उद्बत्तीची विभूती यांच्याही (छायाचित्रांच्या) चाचण्या करण्यात आल्या.

१ अ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि एक साधक या दोघांवरही श्रीरामरक्षास्तोत्र पठणाचा सकारात्मक परिणाम होणे : श्रीरामरक्षाचे पठण करण्यापूर्वी साधकामध्ये ४.७ मीटर नकारात्मक ऊर्जा होती; पण पठण केल्यानंतर ती नाहीशी झाली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर आणि चाचण्यांतील अन्य घटक यांच्यामध्ये नकारात्मक ऊर्जा आढळली नाही. या चाचण्यांतील सर्व घटकांतील सकारात्मक ऊर्जेच्या नोंदी पुढे दिल्या आहेत.
वरील नोंदींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर श्रीरामाच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत ३० मीटरने वाढ झाली. त्या ठिकाणच्या विभूतीमध्ये ४४ मीटर सकारात्मक ऊर्जा आढळून आली. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यानंतर साधकातील सकारात्मक ऊर्जेत ९.६ मीटरने वाढ झाली.
२. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर श्रीरामाच्या चित्रातील सकारात्मक ऊर्जेत ४३३ मीटरने वाढ झाली. त्या ठिकाणच्या विभूतीमध्ये ३९४ मीटर सकारात्मक ऊर्जा आढळली. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यानंतर सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांतील सकारात्मक ऊर्जेची प्रभावळ २० सहस्र मीटरने, म्हणजे विलक्षण वाढली.

२. चाचण्यांचा निष्कर्ष
यातून लक्षात येते की, सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि एक साधक या दोघांनाही श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर आध्यात्मिक स्तरावरील लाभ झाले; पण त्याचे प्रमाण निराळे आहे. तसेच दोघांनी एकाच चित्रासमोर पठण केले असले, तरी त्या चित्रातून प्रक्षेपित झालेल्या श्रीरामतत्त्वाचे (चैतन्याचे) प्रमाण निराळे आहे.


३. चाचण्यांतील नोंदींचे अध्यात्मशास्त्रीय विश्लेषण
३ अ. श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर साधकाभोवती संरक्षककवच निर्माण होणे : श्रीरामरक्षास्तोत्राच्या पठणामुळे विशिष्ट शक्ती (चैतन्य) निर्माण होते. त्यामुळे स्तोत्रपठण करणार्याच्या भोवती संरक्षककवच निर्माण होते. साधकाने श्रीरामरक्षास्तोत्राचे भावपूर्ण पठण केले. त्यामुळे श्रीरामाच्या चित्रातील चैतन्य कार्यरत होऊन साधकाभोवती संरक्षककवच निर्माण झाले. साधकाने आश्रमातील ध्यानमंदिरात पठण केल्याने तेथील सात्त्विकतेचाही त्याच्यावर सकारात्मक परिणाम झाला. यामुळे साधकातील नकारात्मक ऊर्जा नाहीशी झाली आणि त्याच्यातील सकारात्मक ऊर्जा वाढली. श्रीरामाच्या चित्रातून प्रक्षेपित झालेल्या चैतन्याचा सकारात्मक परिणाम विभूतीवर झाला. त्यामुळे विभूतीमध्येही पुष्कळ सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून देवतांचे स्तोत्र भावपूर्ण म्हणण्याचे महत्त्व लक्षात येते.
३ आ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी श्रीरामरक्षास्तोत्राचे पठण केल्यावर त्यांच्यातील समष्टी भावामुळे श्रीरामाच्या चित्रातील देवतातत्त्व समष्टी-कल्याणार्थ कार्यरत होणे : सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर हे अत्युच्च पातळीचे समष्टी संत आहेत. ते करत असलेली कोणतीही कृती ही समस्त सृष्टीच्या कल्याणासाठी असते. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांनी श्रीरामाच्या चित्रासमोर पठण केल्यावर त्या चित्रातील सकारात्मक ऊर्जा ३० मीटरवरून ४६३ मीटर एवढी विलक्षण वाढली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांच्या समष्टी भावामुळे श्रीरामाच्या चित्रातील देवतातत्त्व जागृत होऊन ते समष्टीसाठी कार्यरत झाले. साधकाने जेव्हा त्याच चित्रासमोर दुसर्या दिवशी पठण केले, तेव्हा त्या चित्रातील चैतन्य केवळ त्या साधकापुरतेच कार्यरत झाले. त्यामुळे चित्रातील सकारात्मक ऊर्जा ७० मीटरवरून १०५ मीटर इतकी वाढली. सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टर यांनी त्यांच्या कार्यानुरूप श्रीरामतत्त्व (चैतन्य) ग्रहण केले. त्यामुळे सच्चिदानंद परब्रह्म डॉक्टरांमधील सकारात्मक ऊर्जेत पुष्कळ प्रमाणात वाढ झाल्याचे दिसून आले. श्रीरामाच्या चित्रातील कार्यरत चैतन्याचा सकारात्मक परिणाम विभूतीवर झाला. त्यामुळे विभूतीमध्ये पुष्कळ प्रमाणात सकारात्मक ऊर्जा आढळून आली. यातून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासम समष्टी संतांची प्रत्येक कृती ही समष्टी-कल्याणार्थ असते, हे लक्षात येते.’
– सौ. मधुरा धनंजय कर्वे, महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (३०.११.२०२४)
ई-मेल : mav.research2014@gmail.com
वाचकांना सूचना : ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’ या लेखातील ‘यू.ए.एस्.’ उपकरणाची ओळख’, ‘उपकरणाद्वारे करावयाच्या चाचणीतील घटक आणि त्यांचे विवरण’, ‘घटकाची प्रभावळ मोजणे’, ‘परीक्षणाची पद्धत’ आणि ‘चाचणीमध्ये सारखेपणा येण्यासाठी घेतलेली दक्षता’ ही नेहमीची सूत्रे सनातन संस्थेच्या http://goo.gl/tBjGXa या लिंकवर दिली आहेत. या लिंकमधील काही अक्षरे कॅपिटल (Capital) आहेत. |