
बेंगळुरू – पत्रकार गौरी लंकेश हत्या प्रकरणातील अटकेतील आरोपी शरद कळसकर यांना प्रधान शहर दिवाणी आणि सत्र न्यायालयाचे न्यायाधीश बी. मुरलीधर पै यांनी जामीन संमत केला. कळसकर यांना जामीन मिळाल्याने या प्रकरणातील सर्व आरोपींना जामीन मिळाला. जामिनासाठी त्यांनी दिवाणी आणि सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. राज्यघटनेच्या कलम २१ नुसार जगणे हा प्रत्येकाचा मूलभूत अधिकार आहे. खटला प्रलंबित असतांना आरोपींना वैयक्तिक अधिकारापासून वंचित ठेवता येणार नाही. सर्वाेच्च न्यायालयानेही म्हटले की, अवाजवी अधिकार आरोपीच्या जीवनाचा अधिकार अल्प करील. याचिकाकर्ता सप्टेंबर २०१८ पासून कोठडीत असून त्यामुळे त्याला जामीन संमत केला जाऊ शकतो’, असे न्यायाधीश पै यांनी जामीन संमत करतांना म्हटले.