‘रामनाथी (गोवा) येथील सनातन संस्थेच्या आश्रमातील परिसरात श्री भवानीदेवीसाठी नवीन देऊळ बांधण्यात आले. त्या नूतन देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
आपल्याला ठाऊक आहे की, देवळात एखाद्या देवतेची मूर्ती प्रतिष्ठापित केल्यावर तिच्यामध्ये त्या देवतेचे तत्त्व येते. देवतेचे तत्त्व, म्हणजे त्या देवतेची सूक्ष्मातील स्पंदने ! देवळाच्या कळसामुळे ब्रह्मांडातील देवतेची सूक्ष्मातीसूक्ष्म (निर्गुण स्तरावरील) स्पंदने आकर्षित होण्यास साहाय्य होते, तसेच देवतेच्या मूर्तीतून प्रक्षेपित होणारी सगुण स्तरावरील स्पंदनेही कळसाकडून प्रक्षेपित होतात. ही सर्व सूक्ष्मातील प्रक्रिया आहे. ती लक्षात येण्यासाठी ‘देवळात देवतेची मूर्ती स्थापित करण्याअगोदर देवळातील स्पंदने कशी असतात ? देवळात देवतेची मूर्ती बसवल्यावर; पण तिच्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी तेथे स्पंदने कशी असतात ? मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेनंतर, तसेच प्राणप्रतिष्ठेच्या दुसर्या दिवशी देवळात स्पंदने कशी असतात ?’इत्यादींचा अभ्यास देवळातील नाद (कंपने) ध्वनीमुद्रित करून करण्यात आला. हा नाद १. देवळात भूमीलगत, २. भूमीपासून ३० सें.मी. अंतरावर, ३. देवळाचा घुमट (कळसाच्या खालचा अर्धगोलाकार भाग) आरंभ होतो तिथे आणि ४. देवळात घुमटामध्ये सर्वांत वरच्या ठिकाणी (कळसाला आरंभ होतो तिथे), अशा चार स्थानी ध्वनीमुद्रित करण्यात आला. प्रत्येक नाद हा एक ते दीड मिनिटांचा होता. ते सर्व नाद ऐकून मला आलेल्या अनुभूती आणि ‘त्यांवरून देवळात श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अनुषंगाने देवीचे तत्त्व येण्याची काय प्रक्रिया घडली ?’, याची माहिती या लेखाद्वारे आपण पहात आहोत. आज मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतरची प्रक्रिया पाहूया.
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/872058.html

५ आ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर ध्वनीमुद्रित केलेले नाद
आदल्या दिवशी (१५.६.२०२०) तत्त्वहोम करून यज्ञाद्वारे मंत्रशक्तीने ग्रहण केलेले आणि कलशातील पाण्यात उतरवलेले श्री भवानीदेवीचे तत्त्व या दिवशी तिच्या मूर्तीवर मंत्रांद्वारे चढवण्यात आले. त्यानंतर देवीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. प्राणप्रतिष्ठा झाल्यावर श्री भवानीदेवीच्या मूर्तीची षोडशोपचार पूजा करण्यात आली. देवीला श्रृंगार (साडी नेसवणे, अलंकार घालणे इ.) करण्यात आला. प्रधान होमाची पूर्णाहुती करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
वरील अनुभूतींतून पुढील सूत्रे लक्षात आली.
१. देवळातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा पूर्ण झाल्यामुळे देवीचे कार्य आरंभ झाल्याचे जाणवले. कळसाद्वारे ब्रह्मांडातील देवीची पुष्कळ सूक्ष्म स्पंदने मूर्तीकडे सातत्याने येत असल्याची अनुभूती आली.
२. देवळात वरून खाली शक्ती, भाव आणि शांती यांची स्पंदने जाणवली. हे योग्यच आहे; कारण देवीच्या चेहर्याकडे बघितल्यावर शक्ती जाणवते, तिच्या अनाहतचक्राशी भाव आणि चरणांशी शांती जाणवते.
६. सारांश
श्री भवानीदेवीच्या प्रतिष्ठापना विधीच्या कालावधीत ध्वनीमुद्रित केलेल्या नादांच्या अनुभूतींवरून ‘देवळात देवीच्या मूर्तीमध्ये देवीचे तत्त्व येण्याची काय प्रक्रिया घडते ?’, हे लक्षात आले. हा एक महत्त्वपूर्ण अभ्यास आहे. त्यामधून पुढील ठळक गोष्टी लक्षात आल्या.
अ. आरंभी जरी देवळात देवतेची मूर्ती नसली, तरी मूर्तीस्थापनेचा संकल्प करण्यात आला असल्याने देऊळ ब्रह्मांडातील देवीतत्त्वाशी जोडले जाऊन देवळाचे कार्य आरंभ झाले होते.
आ. वास्तुहोम, नवग्रह होम आणि प्रधान देवता (श्री भवानीदेवी) होम केल्यामुळे संकल्पित देवतेचे तारक आणि मारक तत्त्व येणे सुकर झाले. तसेच देवळावर कळस स्थापन केल्यामुळे त्यातून स्पंदने प्रक्षेपित होऊ लागली.
इ. श्री भवानीदेवीच्या मूर्तीचे डोळे सूक्ष्मातून उघडण्याचा विधी झाल्यामुळे आणि देवीची मूर्ती देवळात पिंडिकेवर प्राणप्रतिष्ठा न करता नुसती ठेवूनही देवळात चैतन्य येऊ लागले, तसेच देवळात प्राणशक्तीही येत असल्याचे लक्षात आले. यावरून ‘देवीची मूर्ती जागृतावस्थेत येण्याची प्रक्रिया घडत आहे’, असे जाणवले, तसेच देवीचे सूक्ष्मातून रणदुंदुभी आणि नगारे वाजवून स्वागत होत होते.
ई. देवीची मूर्ती देवळात पिंडिकेवर ठेवल्यामुळे तेथे ब्रह्मा, विष्णु आणि महेश या त्रिमूर्तींचे अस्तित्व जाणवू लागले. तसेच देवळात इच्छाशक्ती, क्रियाशक्ती आणि ज्ञानशक्ती कार्यरत झाल्या.
उ. देवीच्या प्राणप्रतिष्ठेच्या अंतर्गत प्रधान देवता (श्री भवानीदेवी) होम आणि तत्त्वहोम केल्यामुळे देवळात घुमटाच्या येथे शिव-पार्वती यांचे निर्गुण रूप आणि मूर्तीच्या येथे शिव-पार्वती यांचे सगुण रूप कार्यरत झाल्याची अनुभूती आली, तसेच देवीच्या ‘कालीमाता’ या मारक आणि उग्र रूपाचीही अनुभूती आली.
ऊ. देवळात घुमटामध्ये ब्रह्मांडातील स्पंदने निर्माण झाली. त्यामुळे शांतीची अनुभूती आली.
ए. देवळात भूमीलगत खोल समुद्रातील स्पंदने जाणवली आणि त्यांमुळे गाढ शांतीची अनुभूती आली.
ऐ. मूर्तीवर श्री भवानीदेवीचे तत्त्व मंत्रांद्वारे चढवल्यावर, तसेच देवीची प्राणप्रतिष्ठा करून तिची षोडशोपचार पूजा केल्यावर प्राणप्रतिष्ठेचे सर्व विधी पूर्ण झाले. तेव्हा कळसाद्वारे ब्रह्मांडातील देवीची पुष्कळ सूक्ष्म स्पंदने मूर्तीकडे सातत्याने येत असल्याची अनुभूती आली.
ओ. देवळात वरून खाली शक्ती, भाव आणि शांती यांची स्पंदने जाणवू लागली. देवळात श्री भवानीदेवीची मूर्ती पूर्ण जागृत होऊन कार्यरत झाली.
अशा प्रकारे श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचे सर्व विधी भावपूर्ण आणि परिपूर्ण केल्यामुळे, तसेच श्री भवानीदेवीच्या देवळाचे स्थान आश्रमासारख्या सात्त्विक ठिकाणी असल्यामुळे हे नूतन देऊळ साधक-भक्तांसाठी सर्व स्पंदनांनी साकार झाले.
७. कृतज्ञता
श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेच्या कालावधीत ध्वनीमुद्रित केलेल्या नादांचा अभ्यास केल्यामुळे ‘देवतेचे तत्त्व देवळात कशा प्रकारे येते ?’, हे समजू शकले. हा अभ्यास श्री भवानीदेवी आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने करता आला. यासाठी आम्ही त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहोत.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (१५.१०.२०२४) (समाप्त)
|