नवी देहली – देशात ‘ह्युमन मेटापन्यूमो व्हायरस’चे (एच्.एम्.पी.व्ही.चे) आतापर्यंत ८ रुग्ण आढळून आले आहेत. नागपूर येथे २ रुग्ण आढळले आहेत. यात १३ वर्षांची मुलगी आणि ७ वर्षांचा मुलगा यांचा समावेश आहे. दोघांनाही रुग्णालयात प्रविष्ट (दाखल) करावे लागले नसले, तरी घरी उपचार घेऊन त्यांची प्रकृती नियंत्रणात आहे. बंगालमध्येही ५ महिन्यांच्या मुलामध्ये या आजाराची लक्षणे आढळून आली आहेत. त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार चालू आहेत. चेन्नई येथे २ मुलांना संसर्ग झाल्याचे आढळून आले. त्याआधी बेंगळुरू येथे २ आणि कर्णावती (गुजरात) येथे १ असे ३ रुग्ण आढळले होते.
केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी. नड्डा यांनी सांगितले की, हा नवीन विषाणू नसल्याचे तज्ञांनी म्हटले आहे. त्याला वर्ष २००१ मध्ये पहिल्यांदा ओळखले गेले. त्यानंतर तो जगभर पसरला. जागतिक आरोग्य संघटना परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.