सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांची मुलाखत घेऊन त्‍यांच्‍या साधनाप्रवासाचे उलगडलेले विविध पैलू !

१४.३.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) सनातनच्‍या १२३ व्‍या (समष्‍टी) संतपदी विराजमान झाल्‍याचे सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी घोषित केले. त्‍या सोहळ्‍यात आरंभी सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्‍यासाठी त्‍यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीच्‍या काही भाग ३.१.२०२५ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.

(भाग ५)

याच्या आधीचा लेख वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/869646.html

सद्गुरु स्वाती खाडये

८ ई. पूर्णवेळ साधना करण्‍यासाठी कुटुंबियांनी विरोध न करणे 

सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे : ‘दोघांनी एवढी चांगली नोकरी सोडली. तुमचे पुढे कसे होणार ?’, असे साधकांनीही तुम्‍हाला विचारले असेल ना ? मग त्‍यावर तुम्‍ही कशी मात केलीत ?

सौ. मनीषा पाठक : आम्‍ही पूर्णवेळ साधना करू लागलो. तेव्‍हा माझ्‍या बाबांचे निधन झाले होते. घरी केवळ आईच होती आणि आधीपासून तिचे आमच्‍या साधनेला साहाय्‍य होते. पूर्णवेळ साधनेच्‍या निर्णयालाही आईची संमती होती. सासरी आमचे कुटुंब मोठे आहे; पण गुरुदेवांच्‍या कृपेने त्‍यांनीही आम्‍हाला पूर्णवेळ साधक होण्‍यासाठी विरोध केला नाही. सासू-सासर्‍यांच्‍या ‘मुलगा’ म्‍हणून महेश (श्री. महेश पाठक, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) यांच्‍याकडून काही अपेक्षा नव्‍हत्‍या.

८ उ. साधकांनी ‘तुम्‍ही पूर्णवेळ साधक होऊ नका’, असे समजावणे आणि श्री. महेश यांनी मिळेल ती सेवा करण्‍याची सिद्धता असल्‍याचे सांगणे : साधकांनी ‘तुम्‍ही पूर्णवेळ साधक होऊ नका’, असे आम्‍हाला समजावले. साधक मला म्‍हणायचे, ‘‘ताई, आता तुमची आध्‍यात्मिक पातळी चांगली आहे. तुमच्‍याकडे सेवांचे दायित्‍व आहे; पण समजा, उद्या तुमच्‍याकडून चुका झाल्‍या, तसेच तुमची आध्‍यात्मिक पातळी घसरली, तर कदाचित् तुम्‍हाला सेवा नाही मिळणार. तुम्‍हाला महेशच्‍या घरून किंवा तुमच्‍या माहेरहून आर्थिक पाठबळही नाही.’’ तेव्‍हा महेश त्‍यांना प्रेमाने उत्तर द्यायचे, ‘‘समजा, आम्‍हाला काही सेवा मिळाली नाही, तर सनातन संस्‍थेच्‍या कुठल्‍याही आश्रमात आम्‍हाला भांडी घासायची सेवा दिली, तर ती सेवासुद्धा आम्‍ही तेवढ्याच आनंदाने करू. दायित्‍व मिळाले नाही, तरी आम्‍ही आता करतो, तेवढ्याच क्षमतेने कोणतीही सेवा करू.’’

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : ‘गुरूंचे मन जिंकायचे आहे’, हा एकच तुमचा दृढ निश्‍चय होता. पुष्‍कळ सुंदर !

सौ. मनीषा पाठक : ‘प.पू. गुरुदेव आपली प्रत्‍येक क्षणाला काळजी घेत आहेत. त्‍यांनी एवढा सगळा त्‍याग केला आहे. आपण तर काहीच करत नाही’, असे मला वाटायचे.

८ ऊ. ‘सौ. मनीषा यांची शारीरिक स्‍थिती पहाता ‘पूर्णवेळ साधना करणे, हे धाडस आहे’, असे साधकांनी सांगितल्‍यावर श्री. महेश यांनी ‘गुरुदेवच तिला चांगले सांभाळतील’, असे सांगणे : मला आध्‍यात्मिक त्रासांमुळे हाडांचा आजार, संधीवात, आमवात (Arthritis), असे त्रास चालू झाले. त्‍यामुळे मी झोपूनच असायचे. तेव्‍हा माझी आई आमच्‍या घरी रहायला आली होती. घरात फार काही सामान नव्‍हते; पण आता घर सोडायचे होते. तेव्‍हाही साधकांनी महेशला समजावले. ते महेशला म्‍हणाले, ‘‘तू पूर्णवेळ साधक होत आहेस; पण मनीषाच्‍या आजारपणाचे काय ? प्रार्थनाला (मुलगी कु. प्रार्थना पाठक, आध्‍यात्मिक पातळी ६८ टक्‍के) कोण सांभाळणार ? हे तुम्‍ही फार मोठे धाडस करत आहात.’’ तेव्‍हा महेश म्‍हणाले, ‘‘माझ्‍यापेक्षा गुरुदेव तिला चांगले सांभाळणार आहेत.’’

सद़्‍गुरु स्‍वाती खाडयेे : ही श्रद्धा महत्त्वाची आहे. ज्‍याला देवाला प्रसन्‍न करून घ्‍यायचे आहे, त्‍याला मायेतल्‍या गोष्‍टींचे काही वाटत नाही.

८ ए. पूर्णवेळ साधक झाल्‍यावर श्री. महेश यांना ते पूर्वी रहात असलेल्‍या घराची आठवणही न रहाणे 

सौ. मनीषा पाठक : आम्‍ही पूर्णवेळ साधना करू लागलो. नंतर आम्‍ही आमची गाडी आणि घरही विकले. कधीतरी आम्‍ही पूर्वी रहात असलेल्‍या भागात सेवेला गेल्‍यावर मी महेश यांना विचारायचे, ‘‘तुम्‍हाला इकडे आल्‍यावर आपल्‍या घराची आठवण येते का ?’’ तेव्‍हा ते म्‍हणायचे, ‘‘येथे ८ व्‍या माळ्‍यावर आपले घर होते; पण मी चुकूनही कधी तिकडे पाहिले नाही.’’

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : देवाने तुम्‍हाला त्‍यातून बाहेर काढले. ‘आपण या घरात रहात होतो’, हा विचार गुरुकृपेने नष्‍ट झाला. हे तुमच्‍या साधनेमुळेच झाले. तुमची साधनेची आंतरिक तळमळ होती. त्‍यामुळे गुरूंनी पावलोपावली तुमची काळजी घेतली.

९. दायित्‍व घेऊन सेवा करणे

पू. (सौ.) मनीषा पाठक

९ अ. दायित्‍व घेऊन सेवा करण्‍याची माझ्‍या मनाची सिद्धता नसणे; पण श्री. महेश यांच्‍या ‘गुरुकृपेने मिळेल, ती सेवा करायची’, या सांगण्‍यानुसार सेवेला आरंभ करणे

सौ. मनीषा पाठक : आम्‍हाला उत्तरदायी साधकांनी सांगितले, ‘‘आता पुणे जिल्‍ह्यात रहायचे आणि येथे दायित्‍व घेऊन सेवा करायची.’’ तेव्‍हा माझ्‍या मनाची सिद्धता नव्‍हती. माझ्‍या स्‍वभावदोषांमुळे अनेक प्रसंग घडायचे आणि मला त्‍यातून बाहेर पडता येत नसे. मला पुष्‍कळ भीती वाटत होती. तेव्‍हा महेश यांनी सांगितले, ‘‘गुरुदेव जी सेवा देतील, ती सेवा करायची. आपण झुल्‍यावरील एक हात सोडला आहे. आता गुरुदेव जेथे ठेवतील, तेथे रहायचे.’’ त्‍यांनी सांगितल्‍याप्रमाणे मी सेवा करण्‍यास आरंभ केला.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : मायेचा हात सोडून देवाचा हात धरला आहे. फारच सुंदर !  ‘आवडी-नावडीनुसार साधना करायची नाही’, असे महेशदादांनी तुमच्‍या मनावर बिंबवले.

सौ. मनीषा पाठक : हो.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : दादांचे कौतुक करावे, तेवढे अल्‍पच आहे.

९ आ. ‘सेवा करतांना चुका झाल्‍यास आध्‍यात्मिक पातळी न्‍यून होईल; म्‍हणून सेवा अल्‍प करूया’, असा विचार मनात न येणे 

सौ. मनीषा पाठक : कुणी एखाद्याच्‍या माघारी बोलले की, मला फार वाईट वाटायचे. एकदा तुम्‍ही मला सांगितले होते, ‘‘आपल्‍या माघारी कोण काय बोलतो ?’, याचे दायित्‍व आपल्‍याकडे नाही. ज्‍यांना तुला साधनेत साहाय्‍य करायचे आहे, ते तुला सरळच सांगतील, ‘मनीषा, तुझे इथे चुकत आहे.’ जे साधक तुझ्‍या माघारी बोलतात, त्‍यांच्‍याकडे लक्ष दिलेस, तर तू कधीच पुढे जाऊ शकणार नाहीस.’’ तुम्‍ही एकदा असेही सांगितले होते, ‘‘आपल्‍या मार्गामध्‍ये कुणी कितीही काटे पेरले, तरी आपण मात्र फुलेच पेरायची.’’ ही तुमची वाक्‍ये माझ्‍या अंतर्मनावर कोरली गेली आहेत. माझ्‍याकडून चुका झाल्‍या, तसेच स्‍वभावदोष-निर्मूलन सत्‍संगात माझ्‍या चुका सांगण्‍यात आल्‍या; पण ‘आपण सत्‍संगाला जाऊ नये, आपली आध्‍यात्मिक पातळी उणावेल किंवा आपण सेवा अल्‍प करूया’, असे विचार माझ्‍या मनात कधी आले नाहीत.

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : मुळात तुम्‍ही आध्‍यात्मिक पातळीमध्‍ये अडकलाच नव्‍हता. ‘गुरुदेवांचे मन जिंकायचे’, हे एकच तुमचे ध्‍येय होते. फारच सुंदर आहे मनीषाताई !

९ इ. सौ. मनीषा यांची व्‍यष्‍टी साधना करण्‍याची प्रकृती असणे आणि गुरुदेवांनी त्‍यांना समष्‍टी साधना करण्‍यासाठी घडवणे 

सौ. मनीषा पाठक : माझ्‍यातील स्‍वभावदोष आणि अहं यांमुळे माझ्‍याकडून चुका व्‍हायच्‍या. तेव्‍हा ‘सेवा करू नये’, असा विचार माझ्‍या मनात कधीच येत नसे; पण मला प्रसंगांना सामोरे जाण्‍याची भीती वाटायची. माझ्‍यात ‘भावनाशीलता’, हा स्‍वभावदोष आणि ‘प्रतिमा जपणे’, हा अहंचा पैलू होता. मी सत्‍संगाला जायला निघाल्‍यावर वाटेतच महेश यांना भ्रमणभाष करून सांगायचे, ‘‘मला सत्‍संगाला यायला जमणार नाही.’’ मी आता एवढे बोलते; पण माझी बोलण्‍याची प्रकृती नाही. मला कुणी सांगितले, ‘तो भ्रमणसंगणक घे आणि सेवा कर’, तर मी आनंदाने करीन; पण गुरुदेवांनी मला घडवले.’

१०. आश्रमजीवन अंगीकारणे 

१० अ. सेवाकेंद्रात आल्‍यावर प्रथम साधकांच्‍या प्रकृतीशी जुळवून घेता न येणे आणि ‘आता देवाचा हात सोडायचा नाही’, असे श्री. महेश यांनी सांगणे

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुम्‍ही सेवाकेंद्रात रहायला आल्‍यावर तुम्‍हाला कसे वाटले ?

सौ. मनीषा पाठक : मला आश्रमजीवन ठाऊक नव्‍हते. आम्‍ही आमची सदनिका सोडली आणि पुणे सेवाकेंद्रात रहायला आलो. प्रथम मला काही साधकांच्‍या प्रकृतीशी जुळवून घेता येत नसे, तरी ‘आता मागे फिरायचे नाही’, असे मी ठरवले होते. महेश मला नेहमी सांगायचे, ‘‘आता परत जाण्‍यासाठीचे दोर कापलेले आहेत. आता काहीही झाले, तरी देवाचा हात सोडायचा नाही.’’ ते मला म्‍हणायचे, ‘‘आश्रमातच काय ? तुला मार्गातही कुणी थोबाडीत मारून सांगितले, ‘मनीषाताई, तुमच्‍यात हा स्‍वभावदोष आणि अहं यांचा पैलू आहे’, तरीही मी ते स्‍वीकारायचे आणि सेवा करायचे. गुरुदेव आपल्‍यासाठी एवढे करत आहेत, तर रडायचे नाही आणि निराशेत जायचे नाही.’’ सद़्‍गुरु ताई, मला कुठूनच मानसिक आधार मिळाला नाही. मला केवळ गुरुदेवांचाच आधार होता.

१० आ. ‘जगाच्‍या पाठीवर सर्वांत सुरक्षित ठिकाण, म्‍हणजे सनातनचे आश्रम आहेत’, असे वाटणे 

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : तुम्‍ही तिघे सोडलात, तर ‘आश्रमात आपल्‍या नात्‍यातील कुणीच नाही’, असे तुम्‍हाला कधी वाटले का ?

सौ. मनीषा पाठक : नाही. असे कधीच वाटले नाही. तेव्‍हा वाटायचे, ‘हा प.पू. गुरुदेवांचा आश्रम आहे आणि आपण सुरक्षित ठिकाणी आहोत. मी रुग्‍णाईत असूनही ‘आपण एकटे नाही’, असे मला वाटायचे. जगाच्‍या पाठीवर सगळ्‍यात सुरक्षित ठिकाण, म्‍हणजे सनातनचे आश्रम !

सद़्‍गुरु स्‍वाती खाडये : अगदी बरोबर ! आश्रमात आदर्श जीवनपद्धत निर्माण झाली आहे ना ! येथे मनात मायेतील विचार येत नाहीत. केवळ साधना करायची आणि गुरूंचे मन जिंकायचे.

सौ. मनीषा पाठक : हो सद़्‍गुरु ताई. आश्रमात आल्‍यावर मला साधकांचे पुष्‍कळ प्रेम मिळाले. मी घरी राहिले असते, तर मला एकच बाबा आणि एकच आई असती. आज मला पुणे जिल्‍ह्यात किंवा बाहेरही पुष्‍कळ आई-बाबा मिळाले आहेत. मला पुष्‍कळ जणांनी प्रेम दिले. आश्रमात मला सगळी नाती मिळाली आहेत.

(पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्‍या संत-सन्‍मान सोहळ्‍याच्‍या वेळी सद़्‍गुरु स्‍वाती खाडये यांनी त्‍यांच्‍या घेतलेल्‍या मुलाखतीतील संकलित भाग) (१४.३.२०२३)

(‘ही मुलाखत सौ. मनीषा पाठक यांना संत म्‍हणून घोषित करण्‍यापूर्वीची असल्‍याने त्‍यांच्‍या नावाच्‍या आधी ‘पूज्‍य’ लावलेले नाही.’ – संकलक)                                            (क्रमशः)

आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.

या लेखाचा भाग ६ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871453.html