१४.३.२०२३ या दिवशी पुणे येथील सौ. मनीषा महेश पाठक (वय ४२ वर्षे) सनातनच्या १२३ व्या (समष्टी) संतपदी विराजमान झाल्याचे सद्गुरु स्वाती खाडये यांनी घोषित केले. त्या सोहळ्यात आरंभी सद्गुरु स्वाती खाडये यांनी सौ. मनीषा पाठक यांचा साधनाप्रवास जाणून घेण्यासाठी त्यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीतील अनेक सूत्रे आपण गेल्या ५ भागांतून जाणून घेतली. आज लेखाचा अंतिम भाग पाहू.
(भाग ६)
या लेखाचा भाग ५ वाचण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/871163.html
१० इ. ‘मुलीसाठी योग्य असेल, ते देव घडवील’, असा आदर्श विचार असलेले पाठक दांपत्य !
सौ. मनीषा पाठक : साधक मला म्हणत, ‘‘प्रार्थनाला (मुलगी कु. प्रार्थना पाठक, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) गौरी-गणपति इत्यादी उत्सवांविषयी कसे कळणार ? तिला कर्मकांडातल्या गोष्टी कशा समजणार ?’’ तेव्हा आम्ही म्हणायचो, ‘‘तिच्यासाठी जे योग्य असेल, ते देव तिला देईल.’’ महेश (पती श्री. महेश पाठक आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) प्रार्थनाच्या संदर्भात कधी भावनिक झाले नाहीत. ते म्हणतात, ‘‘तिलाही सगळ्यांतून जाऊ दे. तिच्याही चुका होऊ देत. तिलाही तावून-सुलाखून निघू दे. ‘साधना करणे सोपे नाही’, हे तिलाही कळू दे.’’
११. तीव्र शारीरिक त्रासांतही अनुभवलेली गुरुकृपा !
११ अ. त्वचाविकारामुळे दीड वर्ष अंथरुणाला खिळून असतांना एकही दिवस साधना आणि सेवा यांत खंड न पडणे
सद्गुरु स्वाती खाडये : वर्ष २०१९ पासून तुम्हाला ‘सोरायसिस’ (टीप) झाला आणि २ वर्षे तुम्ही अंथरुणावरच होता; पण तुम्ही एकही दिवस साधनेत खंड पडू दिला नाही, तसेच एकही दिवस तुम्ही सत्संग घेणे थांबवले नाही.
टीप – सोरायसिस : हा तीव्र दाहक, दीर्घकाळ बरा न होणारा आणि संसर्गजन्य नसलेला त्वचारोग आहे.
सौ. मनीषा पाठक : फेब्रुवारी २०१९ मध्ये मला ‘सोरायसिस’ हा आजार झाला. तेव्हा माझे डोके आणि अंग यांवरील त्वचेची सालपटे निघायची. माझे तोंड आतून सोलवटून निघायचे. मला दिवसभर ‘गाऊन’च घालावा लागायचा.
११ आ. दळणवळण बंदीच्या काळात दीड वर्ष रामनाथी आश्रमात रहायला मिळणे : प.पू. गुरुदेवांच्या कृपेने मला काही वैद्यकीय चाचण्यांसाठी रामनाथी आश्रमामध्ये जावे लागले. तेव्हा कोरोना महामारीमुळे सर्वत्र दळणवळण बंदी (लॉकडाऊन) होती. त्या वेळी आम्ही दीड वर्ष रामनाथी आश्रमातच थांबलो. तेव्हा ‘आपत्काळात देव कसे रक्षण करणार आहे ?’, हे आम्हाला अनुभवता आले.
११ इ. टाळूच्या त्वचाविकारामुळे सौ. मनीषा यांना डोक्यावरील सर्व केस काढावे लागणे आणि त्या अन् त्यांचे कुटुंबीय यांनी ते सहजतेने स्वीकारणे : नोव्हेंबर २०२९ मध्ये मला ‘स्काल्प (टाळूचा) सोरायसिस’ झाला. आधुनिक वैद्यांनी ‘तुमच्या डोक्यावरचे सर्व केस काढावे लागतील’, असे सांगितले. याविषयी आम्हा कुणालाच काही अडचण नव्हती. २६.११.२०१९ या दिवशी माझ्या डोक्यावरचे सगळे केस काढले. तेव्हा ‘आपण कसे दिसू ?’, असा विचार माझ्या मनात कधीच आला नाही. ‘आपण जसे आहोत, तसे सेवेला जाऊ’, असा माझा विचार होता.
सद्गुरु स्वाती खाडये : केस हे स्त्रियांचे सौंदर्य असते ना ! पण देवाला देह नाही, तर मन हवे आहे.
सौ. मनीषा पाठक : आधी मी प्रकृतीने स्थूल नव्हते. मधल्या काळात मी स्थूल झाले. तेव्हा साधक मला म्हणायचे, ‘‘सूज वाढली आहे. चेहरा कसा दिसतोय ?’’ तेव्हा मला वाटायचे, ‘परात्पर गुरु डॉक्टरांना ठाऊक आहे ना !’
या दोघांनीही (यजमान आणि मुलगी यांनी) ‘माझ्या डोक्यावर केस नाहीत. मला चालता येत नाही’, असे मला कधीच जाणवू दिले नाही. केस आणि साधना यांचा काही संबंध नाही. त्यामुळे मलासुद्धा त्याचे काही वाटले नाही. त्या वेळी महेश सोलापूर सेवाकेंद्रात होते आणि आई ८ मास रामनाथीला होती. मुलीने आईची सेवा करायची असते; पण आईनेच माझी सेवा केली. ‘माझे प्रारब्ध तीव्र असले, तरी माझ्यावर गुरुदेवांची पुष्कळ कृपा आहे’, असे माझ्या लक्षात आले.
सद्गुरु स्वाती खाडये : ‘गुरुदेव प्रारब्ध संपवतात’, याची प्रचीती तुम्हाला आली. देवाने तुम्हाला प्रारब्ध सोसण्याची शक्ती दिली.
१२. ‘गुरुदेवांची कृपा आणि सद्गुरु स्वाती खाडये यांचे मार्गदर्शन’, यांविषयी सौ. मनीषा यांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !
सद्गुरु स्वाती खाडये : दळणवळण बंदीच्या (लॉकडाऊनच्या) काळात पुणे जिल्ह्यातील साधकांची आध्यात्मिक प्रगती झाली. हे कसे शक्य झाले ?
सौ. मनीषा पाठक : गुरुदेवांची कृपा आणि तुमचे मार्गदर्शन मिळाले; म्हणूनच मी थोडीफार सेवा करू शकते.
सद्गुरु स्वाती खाडये : तुमची तळमळ होती आणि गुरुदेवांची कृपा अन् आशीर्वाद होता. तुम्ही गुरूंवर दृढ श्रद्धा ठेवून प्रत्येक प्रसंगाला सामोर्या गेलात. ‘मला गुरूंचे मन जिंकायचे आहे’, असा तुमचा दृढ निश्चय होता. तुम्ही महेशदादा आणि प्रार्थना यांच्या मनावरही हेच बिंबवले अन् तुम्ही तिघांनी एकमेकांना साधनेत साहाय्य केले. तुमच्या साधनाप्रवासातून आम्हाला पुष्कळ शिकायला मिळाले.’
(पू. (सौ.) मनीषा महेश पाठक यांच्या संत-सन्मान सोहळ्याच्या वेळी सद्गुरु स्वाती खाडये यांनी त्यांच्या घेतलेल्या मुलाखतीतील संकलित भाग) (१४.३.२०२३)
(‘ही मुलाखत सौ. मनीषा पाठक यांना संत म्हणून घोषित करण्यापूर्वीची असल्याने त्यांच्या नावाच्या आधी ‘पूज्य’ लावलेले नाही.’ – संकलक)
(समाप्त)