कन्नड जिल्ह्यातील (कर्नाटक) मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याप्रकणी सर्वाेच्च न्यायालयाचा दृष्टीकोन !

१. मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्याप्रकरणी २ हिंदु तरुणांवर गुन्हा नोंद 

‘कर्नाटकमध्ये कन्नड जिल्ह्यातील कडाबा तालुक्यात २ हिंदु तरुणांनी एका मशिदीमध्ये ‘जय श्रीराम’च्या घोषणा दिल्या. या प्रकरणी पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध फौजदारी गुन्हा नोंदवला. हा गुन्हा रहित होण्यासाठी त्यांनी फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम ४८२ अंतर्गत कर्नाटक उच्च न्यायालयात धाव घेतली. या तरुणांनी मशिदीत घुसून अतिक्रमण केल्यासारखे आरोप नव्हते, तर केवळ दुसर्‍याच्या प्रार्थनास्थळामध्ये जाऊन ‘जय श्रीराम’ या घोषणा दिल्या, असे आरोप होते. कर्नाटक उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते आणि पोलीस यांचे म्हणणे ऐकून घेतले आणि ‘जय श्रीराम’च्या घोषणा देणे, हा गुन्हा होऊ शकत नाही’, असे स्पष्ट केले.

(पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी

२. सर्वोच्च न्यायालयाची कर्नाटक सरकारला उत्तर देण्याची सूचना 

कर्नाटक उच्च न्यायालयाच्या निवाड्याच्या विरोधात धर्मांधांनी सर्वाेच्च न्यायालयात धाव घेतली. येथे न्यायमूर्तींनी ‘हिंदु तरुणांनी ‘जय श्रीराम’ असे म्हटल्यामुळे गुन्हा कसा काय होऊ शकतो ?’, असा प्रश्न धर्मांधांना विचारला. त्यानंतर धर्मांधांनी युक्तीवाद केला, ‘जय श्रीराम’ च्या घोषणा मशिदीत दिल्यामुळे सामाजिक शांतता भंग पावते आणि एका समाजाच्या श्रद्धा आणि भावना यांना आव्हान दिल्याप्रमाणे होते. त्यामुळे हा गुन्हा ठरतो.’ या प्रकरणी सर्वाेच्च न्यायालयाने कर्नाटक सरकारला उत्तर मागितले आहे.

‘हिंदु तरुणांवर ‘मशिदीत प्रवेश करून अतिक्रमण केले’, असा गुन्हा नोंदवला असता, तर गोष्ट वेगळी होती; मात्र केवळ ‘जय श्रीराम’ या घोषणा दिल्यामुळे गुन्हा होत नाही’, हे कर्नाटक उच्च न्यायालयाचे मत योग्य असल्याचे वाटते. या प्रकरणात सर्वोच्च न्यायालय काय भूमिका घेते, ते बघणे औत्सुक्याचे ठरेल.’ (२०.१२.२०२४)

श्रीकृष्णार्पणमस्तु ।

– (पू.) अधिवक्ता सुरेश कुलकर्णी, मुंबई उच्च न्यायालय