रामाच्याच इच्छेने सर्व चालते, अशी दृढ श्रद्धा असावी !

ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज

श्रीमहाराजांचा (ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचा) शिष्य परिवार मोठा होताच; पण त्यांच्यावर प्रेम करणारी इतर मंडळीही बरीच होती. त्यामुळे गोंदवल्यास सतत पुष्कळ अन्नसंतर्पण चाले. हे लक्षात घेऊन एक चिकित्सक गृहस्थ श्रीमहाराजांना म्हणाले, ‘सध्या काळ टंचाईचा आहे, तरीही येथे यथास्थित अन्नदान चालू आहे. ते व्यावहारिक साधनांनी चाललेले नसून सिद्धीच्या वापरण्यानेच चालू असले पाहिजे. ‘सिद्धी वापरणे योग्य नाही’, असे शास्त्र सांगते, मग हे कसे ?’ यावर श्रीमहाराज म्हणाले, ‘तुम्ही म्हणता त्याप्रमाणे येथे सिद्धीचा वापर केला जात नाही. येथे जे सारे चालते, ते सर्वस्वी रामाच्या इच्छेनेच चालले आहे. अशीच भावना मनात धरून जर तुम्ही प्रपंच कराल, तर तुमचा प्रपंचही जसे येथे चालते तसा चालेल. आता क्षणभर धरून चालू की, येथे सिद्धीचा वापर होतो. आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी गेलो, म्हणजे संकल्प  सोडतो. गंगेतील पाणी घेऊन गंगेतच आपण संकल्प सोडतो. त्याचप्रमाणे भगवंताचे साहाय्य घेऊन जनताजनार्दनाला पोटभर जेवू घालून संतुष्ट करण्यात मुळीच दोष नाही. तुमचा हा विकल्प देहबुद्धीचा परिणाम आहे.’

(साभार : ‘श्रीब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या हृद्य आठवणी’ या पुस्तकातून, लेखक : ल.ग. मराठे)