
पुणे – १ ते १५ जानेवारीपर्यंत सरकार नियमित कामाला लागेल. पुणे महापालिकेचे विभाजन हाच प्राधान्याचा विषय असेल, असे सुतोवाच उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले. ‘अडीच वर्षे रखडलेल्या महापालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच हा निर्णय होईल’, असेही ते म्हणाले. ‘श्रमिक पत्रकार संघा’ने पुण्यातील आमदारांचे पत्रकारांसमवेत वार्तालापाचे आयोजन केले होते. त्यात ते बोलत होते. वाहतूक, पाणी प्रश्न, गुन्हेगारी यांमुळे निर्माण होणार्या अडचणी यांवर चर्चा होऊन कामकाजाची माहिती आमदारांनी दिली. ‘महापालिकेच्या निवडणुकीअभावी नगरसेवक आणि नागरिक यांत संवाद नाही; मात्र आता हा विषय प्राधान्याने घेण्यात येईल’, असे पाटील यांनी सांगितले.
‘पुण्यातील वाहतुकीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी मेट्रोचे जाळे वाढवणे, हा उपाय असून त्याकडे लक्ष आहे’, असे हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी सांगितले.
‘नागरिकांनी सांगितलेल्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी प्रयत्नरत रहात असून विकासकामांचा पाठपुरावा केला की, कामे मार्गी लागतात असा अनुभव आहे’, असे खडकवासलाचे आमदार भीमराव तापकीर यांनी सांगितले. ‘पुण्याचा विकास नियोजनबद्ध असेल. समाविष्ट गावांमध्येही योग्य पायाभूत सुविधा उभ्या रहातील’, असे नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सांगितले. आमदार बापू पठारे, आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनीही त्यांचे मत व्यक्त केले.