पुणे – शहरात मोठ्या प्रमाणावर असणारी कबुतरे आणि पारवे यांच्यामुळे होणारा त्रास दिवसेंदिवस वाढत आहे. नागरिकांनी पारव्यांना धान्य टाकू नये, असे आवाहन महापालिकेने केले असतांनाही याकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे आदेशाचे पालन न करणार्यांकडून महापालिकेने २८ सहस्र रुपयांचा दंड वसूल केला आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उपायुक्त संदीप कदम यांनी दिली. शहरातील विविध भागांतून ३८ प्रकरणांमध्ये हा दंड वसूल केला आहे. पारवे आणि कबूतर यांमुळे फुफ्फुसांशी संबंधित होणार्या आजारांचे प्रमाण वाढले आहे. महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांनी याची नोंद घेऊन पारव्यांना धान्य टाकणार्यांवर कारवाई करण्याचे आदेश घनकचरा व्यवस्थापन विभागाला दिले होते.
कोथरूड, वारजे माळवाडी, नदीपात्रातील परिसर, स्वारगेट, तसेच सारसबाग परिसर येथे सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता करणे या नियमाअंतर्गत महापालिकेने दंड वसूल केला आहे. ज्या भागांमध्ये कबूतर आणि पारव्यांचे वास्तव्य आहे; अशा जागा शोधून ती ठिकाणे स्वच्छ करण्याची मोहीमही पालिकेने हाती घेतली आहे, असे कदम यांनी सांगितले.