Ladki Bahin Yojana : ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे डिसेंबरचे पैसे देण्यास प्रारंभ !

२ सहस्र १०० रुपये २ मासांनी मिळण्याची शक्यता  

मुंबई – काही दिवसांपूर्वीच नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने’चा डिसेंबरचा हप्ता लवकरच देण्यात येईल, अशी माहिती दिली होती. त्यानंतर ‘योजनेचा डिसेंबर मासाचा हप्ता कधी जमा होणार ?’, याविषयी चर्चा चालू असतांनाच राज्यशासनाने या योजनेचा १ सहस्र ५०० रुपये हप्ता देण्याची प्रक्रिया २४ डिसेंबरपासून चालू केली आहे. या अंतर्गत महिलांना १ सहस्र ५०० रुपयांचा हप्ता मिळणार आहे.

विधानसभा निवडणुकीच्या वेळी ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’च्या रकमेत वाढ करून २ सहस्र १०० रुपये करणार असल्याचे आश्‍वासन महायुतीच्या वतीने देण्यात आले होते; मात्र मार्च मासात उन्हाळी अधिवेशन चालू होईल, त्या वेळी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर म्हणजे २ मासांनी २ सहस्र १०० रुपयांचा हप्ता मिळू शकतो. डिसेंबर २०२४ मध्ये २ टप्प्यांत महिलांना पैसे मिळणार आहेत. पहिल्या टप्प्यात २ कोटी ३५ लाख रुपये महिलांच्या खात्यात १ सहस्र ५०० रुपयांप्रमाणे पैसे जमा होणार आहेत, तर निवडणुकीआधी आलेल्या २५ लाख नवीन आवेदनांची (अर्जांची) पडताळणी चालू आहे. ती पूर्ण झाल्यानंतर या महिलांच्या खात्यात हप्ता जमा होणार आहे. डिसेंबरनंतर पुढील महिन्याच्या हप्त्यासाठी ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचे प्रावधान करण्यात आले आहे.