खजुराचे पीक वाढण्यासाठी अरब देश भारतातून मागवत आहेत शेणखत !

नवी देहली – गेल्या काही वर्षांत शेणाच्या निर्यातीत झपाट्याने वाढ झाली आहे. भारत अनेक देशांमध्ये शेणाची निर्यात करतो. हे देश अनेक प्रकारे शेणखत वापरतात. या देशांमध्ये कुवेतसह अरब देशांचा समावेश आहे.

१. एका संशोधनानुसार या देशांच्या कृषी शास्त्रज्ञांना कळले की, शेणाचा पावडर स्वरूपात वापर केल्याने खजुराचे पीक वाढते.

२. खजूर पिकामध्ये शेणाची भुकटी वापरल्याने फळांचा आकार वाढून उत्पादनातही लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळे खजुराचे उत्पादन वाढवण्यासाठी कुवेत आणि अरब देश भारतातून मोठ्या प्रमाणात शेणाची आयात करतात.

३. तेल आणि वायू यांचे साठे असलेले कुवेत आणि अरब देश खजूर पीक वाढवण्यासाठी शेण आयात करतात. काही काळापूर्वी कुवेतने भारताला १९२ मेट्रिक टन शेणाची मागणी दिली होती.

४. भारतातून निर्यात होणार्‍या शेणाच्या किमतीवरून शेणाची आवश्यकता आणि त्याचे लाभ याचा अंदाज लावता येतो. सध्या भारतातून ३० ते ५० रुपये किलो या दराने शेणाची निर्यात होत आहे. जसजशी त्याची मागणी वेळोवेळी वाढत जाईल, तसतसे भाव आणखी वाढतील.

५. शेतीप्रधान देश असलेल्या भारतात गुरांची संख्याही मोठी आहे. अहवालानुसार भारतात सुमारे ३० कोटी गुरे आहेत. त्यामुळे प्रतिदिन सुमारे ३० लाख टन शेणखत बनते. भारतात शेणखताचा वापर इंधन म्हणून, बायोगॅस बनवण्यासाठी आणि शेणापासून पर्यावरणपूरक उत्पादने बनवण्यासाठी केला जातो. खत म्हणून त्याचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.

संपादकीय भूमिका

रासायनिक खतांऐवजी नैसर्गिक खताचा वापर करायला हवा, हे अरबांना कळते, तर भारतियांना का कळत नाही ?