युक्रेनचे ८ ड्रोन ६ इमारतींवर जाऊन धडकले !

रशियाच्या कझान शहरामध्ये ‘९/११’ सारखे आक्रमण

मॉस्को (रशिया) – रशियाच्या कझान शहरात २१ डिसेंबरच्या सकाळी युक्रेनचे ८ ड्रोन ६ इमारतींना धडकले. ‘९/११’ म्हणजे ११ सप्टेंबर २००१ या दिवशी अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील ‘वर्ल्ड ट्रेड सेंटर’च्या २ इमारतींवर आतंकवाद्यांनी विमानांचे अपहरण करून त्यांद्वारे जशी धडक दिली होती, तशाच प्रकारचे हे आक्रमण करण्यात आले. या आक्रमणात किती जण ठार झाले, याची माहिती अद्याप समारे आलेली नाही. या आक्रमणानंतर रशियाचे २ विमानतळ बंद करण्यात आले आहेत. ४ महिन्यांपूर्वी रशियावर असाच प्रकारचे आक्रमण झाले होते. युक्रेनने रशियातील सेराटोव्ह शहरातील व्होल्गा स्काय या ३८ मजली निवासी इमारतीला लक्ष्य केले होते. यात ४ जण घायाळ झाले होते. यानंतर रशियाने प्रत्युत्तर देत युक्रेनवर १०० क्षेपणास्त्रे आणि १०० ड्रोन डागले. यात ६जणांचा मृत्यू झाला होता, तर १५० हून अधिक जण घायाळ  झाले होते.

कामलेव एवेन्यू, क्लारा जेटकिन स्ट्रीट, युकोजिंस्काया, खादी तक्ताश आणि क्रास्नाया पॉजित्सिया या इमारतींना जाऊन ड्रोन्सनी धडक दिली. दोन अन्य ड्रोन्सनी ऑरेनबर्गस्की ट्रॅक्ट स्ट्रीटवरील घराला लक्ष्य बनवले. आक्रमणानंतर या इमारतींमधून सर्वांना लोकांना बाहेर काढण्यात आले आहे. तसेच येथील २ दिवसांतील सर्व सामूहिक कार्यक्रम रहित करण्यात आले आहेत. कझान शहराच्या महापौरांनी नागरिकांना सुरक्षित स्थळी रहाण्यास सांगितले आहे.