‘माझिया मराठीचे नगरी’
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘आजची मराठी भाषेची दुःस्थिती’ आणि त्यावरील ‘कृतीशील उपाययोजना’ या दृष्टीने काही सूत्रे या मालिकेत आपण पुढे पहाणार आहोत. भाषेची दुःस्थिती पालटण्यासाठी प्रथम दुःस्थिती कशी आहे आणि ती तशी होण्यामागची मीमांसा थोडक्यात समजून घेऊ. जेवढी ती अधिक नीट समजून घेणार तेवढ्या त्यावरील उपाययोजना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेणे आणि त्या कृतीत आणण्यासाठी त्याचा प्रसार करणे शक्य होईल.
१. समाजजीवनातील पालटाचा भाषेवर परिणाम
मराठी भाषेची सध्याची स्थिती समजून घेण्यापूर्वी थोडी ऐतिहासिक पार्श्वभूमी समजून घेऊ. १९ आणि २० व्या शतकात आणि स्वातंत्र्यानंतर अधिक गतीने भारतीय समाजजीवन, संस्कृती, राजकारण, साहित्य, कला या सर्वांवर पाश्चात्त्य विचारांचा प्रभाव पाडण्यात आला आणि पडलाही. अर्थात्च त्याचा परिणाम भारतीय भाषांवर झाला. भारतीय समाजजीवन आणि भाषा यांवरील इंग्रजीचा प्रभाव हा तिच्या राज्यातील स्थानिक संस्कृती अन् समाजजीवन यांवरही झाला. ‘भाषा मरता देशही मरतो, संस्कृतीचाही दिवा विझे’, अशीच काहीशी स्थिती गेल्या २ शतकांमध्ये हळूहळू निर्माण होत गेली.

२. मराठी भाषेवर इंग्रजीचा प्रभाव पाडणारी ऐतिहासिक पार्श्वभूमी
१७ व्या शतकात भारताला इंग्रजी भाषेचा परिचय झाला. वर्ष १८३५ मध्ये भारतात इंग्रजी भाषेतील शिक्षण चालू झाले. वर्ष १९ व्या शतकात महाराष्ट्र, बंगाल यांसारख्या प्रगत राज्यांत इंग्रजी भाषेचे शिक्षण घेणार्या भारतातील पहिल्या पिढ्या निर्माण झाल्या. या पिढीतील, तसेच टिळक, आगरकर यांच्या पिढीतील काही तज्ञ किंवा पंडित हे जसे इंग्रजी भाषेत पारंगत होते, तसेच (स्वधर्म, स्वसंस्कृती, स्वभाषा यांची वीण घट्ट असल्याने) ते संस्कृत भाषेतही पारंगत होते. त्यामुळे त्यांनी इंग्रजी भाषा ‘शिकली’, ती योग्य पद्धतीने राष्ट्र-धर्म कार्यासाठी ‘उपयोगात आणली’, तरी ती ‘अंगिकारली’ नाही. इंग्रजी केवळ ‘परक्या संस्कृती’ची भाषा आवश्यकता म्हणून शिकली. त्या वेळी धर्माचरण तुलनेत अधिक असल्याने समाजजीवनात स्वभाषा, स्वसंस्कृती टिकून होती. पुढे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या काळापर्यंत इंग्रजी शिकणार्या व्यक्ती आंग्ल संस्कृती आणि पाश्चात्त्य वैचारिकता याकडे आकर्षित झाल्या. यात मॅझिनी, मार्क्स, लेनिन आदींचा प्रभाव होता. या काळात इंग्रजी शिक्षण घेणार्या पिढीवर पाश्चात्त्य संस्कृतीचा, साम्यवादाचा प्रभाव कळत-नकळत होऊ लागला आणि धर्माच्या बंधनांची वीण सैल होऊ लागली.
३. स्वातंत्र्यानंतरची स्थिती
स्वातंत्र्यानंतर हिंदूंच्या धार्मिक शिक्षणाला खीळ बसल्याप्रमाणे वातावरण निर्माण झाले. या सर्वांचा परिणाम भारतीय भाषांवर पुढील दशकांमध्ये झाला. भारतातील प्रगत समाजातील उच्चशिक्षित किंवा सुशिक्षित मध्यमवर्गीय अन् श्रीमंत समाजात इंग्रजीचा प्रभाव हळूहळू प्रचंड प्रमाणात वाढून वर्ष १९६०-१९८० पर्यंत चांगल्या अर्थार्जनासाठी ‘इंग्रजीखेरीज पर्यायच नाही’, असे वातावरण भारतीय समाजात निर्माण झाले किंवा करण्यात आले. त्यामुळे या काळात मुलांना इंग्रजी माध्यमात घालणे अपरिहार्य वाटू लागले. याचा परिणाम मराठी भाषिकांच्या मराठीवर झाला.
स्वातंत्र्यानंतर इंग्रजी माध्यमातील शाळांची संख्या वाढणे, हिंदी चित्रपटसृष्टीचा प्रभाव, आर्थिक राजधानी झालेली विविध भाषिकांनी भरलेली मुंबईसारखी शहरे, भारतात वेगाने वाढलेले औद्योगिकीकरण, चांगल्या वेतनाची चाकरी मिळण्यासाठी इंग्रजी भाषा चांगली येण्यास पर्याय नसल्याचे वातावरण निर्माण होणे, इंग्रजी बोलणे म्हणजे समाजजीवनातील उच्च स्तराचे स्थान किंवा प्रतिष्ठा (‘स्टेटस’) असे वातावरण निर्माण होणे, भारतियांचे मोठ्या प्रमाणात वाढलेले विदेशगमन यांसारख्या अनेक गोष्टींचा परिणाम म्हणून ‘इंग्रजी भाषा चांगली येणे’ हे विशेषतः शहरी भागांत अपरिहार्य झाले. इंग्रजीचे व्याकरण, ‘स्पेलिंग’ आदी येवो अथवा न येवो ‘फाडफाड’ इंग्रजी बोलता आले, तर समाजात प्रतिष्ठा’ आदी अनेक गोष्टींचा मिथ्या दिखावाही पुढच्या काळात निर्माण झाला. यात ज्ञानापेक्षा केवळ भाषेला महत्त्व आले. भारताचे जागतिकीकरणही याला कारणीभूत ठरले.
एका बाजूला हा सर्व भाग आणि दुसर्या बाजूला धर्म, संस्कृती, भाषा यांच्या स्वाभिमानाचे खच्चीकरण, त्यांना तुच्छ लेखणे, त्यांचे महत्त्व न्यून करणे, ते पुढील पिढीला समजणार नाही, याची जाणूनबुजून सोय करणे आदी गोष्टींमुळे स्वभाषाभिमान दुरावला.
४. पाणिनी यांच्या ‘अष्टाध्यायी’ ग्रंथातील ‘वृद्धिः’ हा शब्द
जगातील सर्वांत समर्थ संस्कृत व्याकरणकार ‘पाणिनी’ऋषि हे इ.स. पूर्व ८ व्या शतकात होऊन गेले. संस्कृतचे व्याकरण सोप्या पद्धतीने नियमबद्ध करून त्यांनी ‘अष्टाध्यायी’ या ग्रंथात सांगितले. या ग्रंथातील पहिल्या सूत्रातील पहिला शब्द ‘वृद्धिः’ हा आहे. त्यावरून ‘पाणिनी यांना ‘सर्व बंधने तोडून त्यांना भाषेची वृद्धी अपेक्षित आहे’, अशी मते आधुनिक मराठी भाषातज्ञांनी व्यक्त केली आहेत; परंतु काही आधुनिक भाषातज्ञ भाषावृद्धी होण्यासाठी ‘मराठी भाषेत परकीय शब्दांचा वापर करू शकतो’, असाही विपरित निष्कर्ष काढतात.
५. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी भाषेवरील आक्रमण ओळखले !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांची भाषाशुद्धी चळवळ सर्वज्ञात आहे. भाषेतील परकीय शब्दांतील आक्रमणे रोखण्यासाठी संस्कृत भाषेचे जाणकार स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी संस्कृतप्रचुर मराठी शब्दांची निर्मिती केली. ही खरी मराठी ‘वृद्धि’ होती. त्यात नवीन तंत्रज्ञानाच्या इंग्रजी शब्दांचे प्रतिशब्दही होते. प्रा. माधव पटवर्धन यांनीही स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या या भाषावृद्धीच्या कार्यात योगदान दिले.
वर्ष १९३५ मध्ये एक भाषातज्ञ श्री.के. क्षीरसागर यांनी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या भाषावृद्धीच्या काही सूत्रांवर विरोधात भूमिका घेतली.
(क्रमश: पुढच्या शनिवारी)
– सौ. रूपाली अभय वर्तक, सनातन आश्रम, देवद, पनवेल.