Baglamukhi Yagya For Destruction Of Jihadists : जगभरातील जिहादींचा नाश होण्यासाठी केला जात आहे श्री बगलामुखी देवीचा महायज्ञ !

श्री बगलामुखी देवी

हरिद्वार (उत्तराखंड) : बांगलादेशात हिंदूंवर गेल्या ऑगस्ट महिन्यापासून आक्रमण होत आहेत. भारतासह विदेशांतूनही याचा निषेध केला जात आहे. अनेक ठिकाणी याविरोधात मोर्चे काढण्यात येत आहेत. हिंदूंचे रक्षण करण्याची मागणी केली जात आहे. याच पार्श्‍वभूमीवर हरिद्वार येथे जिहादच्या विरोधात यज्ञ करण्यात येत आहे. श्री पंचदशनाम जुना आखाड्याच्या भैरव घाटावर १२ डिसेंबर या दिवशी श्री बगलामुखी देवीचा ‘महायज्ञ’ प्रारंभ करण्यात आला. जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि गाझियाबाद (उत्तरप्रदेश) येथील डासना मंदिराचे पुजारी यति नरसिंहानंद गिरि यांनी या यज्ञाचे आयोजन केले आहे. २१ डिसेंबर या दिवशी यज्ञाची सांगता होणार आहे. त्यांनी सनातन धर्माच्या अनुयायांना महायज्ञात सहभागी होण्याचे निमंत्रण दिले.

श्री पंचदशनाम जुना आखाड्याचे महामंडलेश्‍वर आणि डासना मंदिराचे पुजारी यति नरसिंहानंद गिरि यांनी जिहादच्या विरोधात केले आहे या यज्ञाचे आयोजन !

१. यति नरसिंहानंद म्हणाले की, बांगलादेश, पाकिस्तान आणि भारत येथे हिंदूंची हत्या करणार्‍या जिहादींचा संपूर्ण नाश केल्याखेरीज ‘माणुसकी’ वाचवणे शक्य नाही.

डासना मंदिराचे पुजारी यति नरसिंहानंद गिरि मार्गदर्शन करतांना

२. महामंडलेश्‍वर यति नरसिंहानंद यांनी बगलामुखी देवीला प्रार्थना केली की, हे माते, आमचे सर्व प्रकारे रक्षण कर, आमच्या धर्माच्या शत्रूंचा नाश कर, आमच्या धर्माच्या शत्रूंचा नाश कर. बांगलादेशात आमच्या धर्माचे रक्षण कर. बांगलादेशातील आमच्या सनातनी धर्म बांधवांचे रक्षण कर.

३. साध्वी ऋतंभरा यांनी केंद्र सरकारला बांगलादेशावर दबाव आणण्यास सांगितले, तसेच संयुक्त राष्ट्रांवर या प्रकरणी मौन बाळगल्याचा आरोप केला. त्या म्हणाल्या की, बांगलादेशात सर्व वयोगटातील महिलांवर बलात्कार आणि गैरवर्तन केले जात आहे, हे संपूर्ण हिंदू समाजाचे दुर्दैव आहे.

४. जागतिक धर्म संसदेच्या मुख्य संयोजक उदिता त्यागी आणि जुना आखाड्याचे कोठारी श्री महंत महाकाल गिरि या महायज्ञात सहभागी झाले आहेत.

संपादकीय भूमिका

क्रिकेटचा सामना जिंकण्यासाठी, राजकीय नेत्याच्या विजयासाठी यज्ञ करणार्‍या हिंदूंना आता जगभरातील हिंदूंच्या रक्षणासाठी आणि जिहाद्यांच्या नाशासाठी असे यज्ञ करणे आवश्यक झाले आहे !