बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला जन्मठेप !

साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी ब्रिदे-गोरे हत्या प्रकरण

पनवेल – कोल्हापूर जिल्ह्यातील आळते (तालुका हातकणंगले) येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी ब्रिदे-गोरे हत्या प्रकरणात मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर या २१ एप्रिलला पनवेल येथील सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. या प्रकरणातील कुरुंदकर याचे साथीदार कुंदन भंडारी आणि महेश पाटील यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. यापूर्वी पनवेल न्यायालयाने ५ एप्रिलला या सर्वांना दोषी ठरवले होते आणि ११ एप्रिलला या सर्वांना शिक्षा सुनावण्यात येणार होती; मात्र काही कारणांमुळे ती पुढे गेली आणि २१ एप्रिलला निकाल देण्यात आला.

साहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे-गोरे यांची ११ एप्रिल २०१६ या दिवशी हत्या करून त्यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वसईच्या खाडीत फेकून देण्यात आले होते. या प्रकरणी ७ डिसेंबर २०१७ या दिवशी ठाणे जिल्ह्यात कार्यरत असलेला तत्कालीन पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर याला अटक करण्यात आली होती. ९ वर्षांनंतर या प्रकरणाचा निकाल लागला आहे. या प्रकरणातील कुंदन भंडारी आणि महेश पाटील हे गेल्या काही वर्षांपासून अटकेत असून त्यांनी ही शिक्षा अगोदरच भोगली असल्याने त्यांची सुटका होणार आहे.