Jharkhand Naxalite Encounter : झारखंडमध्ये ८ नक्षलवादी ठार

बोकारो (झारखंड) – येथे २१ एप्रिलला पहाटे सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ८ नक्षलवादी ठार झाले. जिल्ह्यातील लुगू आणि झुमरा या टेकड्यांच्या मध्ये असलेल्या जंगलात ही चकमक झाली. घटनास्थळावरून अनेक शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. या चकमकीत १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी विवेक हादेखील मारला गेला आहे. आतापर्यंत एकूण ८ नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. घटनास्थळी आणखी नक्षलवादी लपून बसल्याची माहिती असून शोधमोहीम चालू आहे.

गुप्त माहितीच्या आधारे केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या २०९ कोब्रा बटालियनचे सैनिक आणि जिल्हा पोलीस हे संयुक्तपणे या जंगलात शोधमोहीम राबवत होते. तेव्हा नक्षलवाद्यांनी सैनिकांना पहाताच त्यांच्यावर गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल सैनिकांनीही गोळीबार केला. साधारण अडीच घंटे ही चकमक चालू होती. त्यात ८ नक्षलवादी ठार झाले. हे सुरक्षादलांचे मोठे यश मानले जात आहे.