|

उडुपी (कर्नाटक) – हल्ली प्रत्येक विद्यार्थी आधुनिक वैद्य (डॉक्टर), अभियंता आदी बनून ‘करिअर’ (कारकीर्द) करण्याच्या मागे लागला असतांना उडुपीतील श्रीपुत्तिगे मठाच्या चालवणण्यात येणार्या सुगुण या शाळेतील विद्यार्थी मात्र पौरोहित्यात ‘करिअर’ करण्यात मग्न आहेत. या शाळेतील प्रत्येक विद्यार्थी इंग्रजी, संस्कृत आणि कन्नड भाषा बोलू, लिहू अन् वाचू शकतो. ९ वर्षांपूर्वी या शाळेची स्थापना करण्यात आली आहे.
१. पुरोहित बनण्यासाठी या शाळेत शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनुष्ठान, कर्मकांड यांसह कर्तव्य आणि नैतिकता यांचे ज्ञान दिले जाते. त्यांना प्राण्यांप्रती दया आणि ज्येष्ठांचा सन्मान करण्यासही शिकवले जाते.
२. मानव आणि निसर्ग यांचे परस्पर अवलंबित्व, शिस्तप्रियता, चिंतनशील जीवनशैलीमागील वैदिक दृष्टीकोन आदींचीही ओळख करून दिली जाते. श्रीपुत्तिगे मठाचे स्वामी प्रसन्नाचार्य यांनी सांगितले की, सध्या सर्व विद्यार्थी ब्राह्मण समाजातील आहेत; मात्र आम्हाला आशा आहे की, भविष्यात देशाच्या सर्व भागांतील, सर्व जातींचे विद्यार्थी येथे येतील आणि ज्ञान-विज्ञानासह पुरोहित बनण्याचे प्रशिक्षण घेतील.’
३. या शाळेचे ‘राष्ट्रीय मुक्त विद्यालयी शिक्षण संस्थे’च्या (‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपन स्कूलिंग’च्या) अंतर्गत संचालन केले जाते. श्रीपुत्तिगे मठाने बेंगळुरू, चेन्नई, कोलकाता आणि हिरियडका येथेही शाळा चालू केल्या आहेत. त्यांत एकूण २५० विद्यार्थी शिकतात. येथे रहाणे, भोजन, तसेच शिक्षण शुल्क म्हणून वर्षाला १६ सहस्र रुपये घेतले जातात.
विदेशातील पुरोहितांची कमतरता भरून काढणार ! – मठाचे व्यवस्थापकयाविषयी माहिती देतांना श्रीपुत्तिगे मठाचे व्यवस्थापक श्री सुगुणेंद्र तीर्थ स्वामीजी म्हणाले, ‘‘अमेरिका, ऑस्ट्रेलिया आणि युरोपीयन देशांत हिंदू लोकसंख्या वाढत आहे. मंदिरांची संख्याही वाढत आहे; मात्र तेथे पुरोहित आणि आचार्य यांची कमतरता जाणवते. या देशांत स्थायिक झालेल्यांची भारतीय संस्कृतीशी नाळ कायम रहावी, यासाठी आम्ही विद्यार्थी घडवत आहोत. येथील विद्यार्थी या शिक्षणामुळे फार आनंदी आहेत.’’ |