परभणी – भारतीय राज्यघटनेच्या प्रतिकृतीच्या विटंबनेनंतर परभणी शहरात मोठी दंगल उसळली होती. त्यात जाळपोळ आणि दगडफेक करून वाहनांची हानी करण्यात आली होती. पोलिसांनी या प्रकरणी आतापर्यंत ८ गुन्ह्यांची नोंद करून ४१ पुरुषांसह ९ महिलांना अटक केली आहे. या प्रकरणी रात्रीच्या वेळी पोलिसांनी ‘कोम्बिंग ऑपरेशन’ राबवल्याचा आरोप होत आहे; पण नांदेड परिक्षेत्राचे महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी हा आरोप फेटाळून लावला आहे.
नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप पत्रकार परिषदेत म्हणाले की, शहरात शांतता आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवतांना धरपकड केली; पण रात्रीच्या वेळी कोणतेही ‘कोम्बिंग ऑपरेशन’ केले नाही. प्रस्तुत घटनेत ९ पोलीस किरकोळ घायाळ झाले आहेत. या प्रकरणी व्हिडिओ आणि सीसीटीव्ही चित्रणाच्या साहाय्याने कारवाई केली जात आहे. जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी जनतेला शांततेचे आवाहन केले आहे, तसेच झालेल्या हानीचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेशही प्रशासनाला दिले आहेत. त्यानुसार पंचनामे करण्याचे काम चालू झाले आहे.