UP Loud Speakers Removed : उत्तरप्रदेशातील २ सहस्र ५०० मशिदी आणि मंदिरे यांवरील अनुमतीविना लावलेले भोंगे पोलिसांनी उतरवले !

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेश राज्यात गेल्या २४ घंट्यांत २ सहस्र ५०० हून अधिक मशिदी आणि मंदिरे यांवरील भोंगे हटवण्यात आले आहेत. राज्यातील कानपूर, लक्ष्मणपुरी, गोरखपूर, संत कबीरनगर, आझमगड, पीलीभीत आणि कानपूर येथे मोठ्या प्रमाणात ही कारवाई करण्यात आली. ६ डिसेंबरला पहाटे ४ वाजल्यापासून अनुमतीविना लावण्यात आलेल्या, तसेच प्रमाणापेक्षा अधिक आवाज असणार्‍या भोंग्यांवर कारवाईला प्रारंभ करण्यात आला. या संपूर्ण कारवाईवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून लक्ष ठेवण्यात येत होते.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या आदेशानंतर कारवाई

उत्तरप्रदेशाचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ४ डिसेंबरला ऑनलाईन बैठक घेऊन पोलिसांना अनुमतीविना लावण्यात आलेल्या भोंग्यांचा शोध घेऊन कारवाई करण्याचा आदेश दिला होता. तसेच त्यापूर्वी मंदिर आणि मशीद यांच्या उत्तरदायींना भेटून स्वतःहून ते हटवण्यास सांगण्याची सूचना केली होती. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.

कानपूर येथे मौलानांचा विरोध

कानपूर येथे पोलिसांनी २४ घंट्यांत ५४ भोंगे हटवले. यावर मौलानांंनी (इस्लामच्या अभ्यासकांनी) नाराजी व्यक्त केली. त्यांनी म्हटले की, नियमानुसार लावण्यात आलेले मशिदींवरील भोंगेही काढण्यात आले. त्या संदर्भात आधी नोटीसही देण्यात आली नाही. आम्ही दिवसातून ५ वेळा प्रत्येकी ५ मिनिटांपेक्षा अल्प वेळ त्यांचा वापर करत असतांनाही कारवाई केली जात आहे.

शहर काझी (इस्लामी कायदेतज्ञ आणि न्यायाधीश) हाफिज अब्दुल कुद्दूस हादी यांनी पोलीस आयुक्तांची भेट घेतली. ते म्हणाले की, यापूर्वीही जेव्हा पोलिसांनी मोहीम राबवली होती, तेव्हा सर्व काही मानकांनुसार करण्यात आले होते. जर भोंगे नियमानुसार असतील, तर ते काढू नयेत.

संपादकीय भूमिका

  • जर उत्तरप्रदेश सरकार शांतपणे आणि कायदा-सुव्यस्था राखत ही कारवाई करू शकते, तर संपूर्ण देशात अशी कारवाई का होऊ शकत नाही ?
  • या कारवाईतून शासनकर्त्यांची इच्छाशक्ती असेल, तर या देशात काहीही अशक्य नाही, हे स्पष्ट होते !