Sukhbir Singh Badal Attacked : पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्या हत्येचा प्रयत्न

सुवर्ण मंदिराच्या प्रवेशद्वारावर बादल यांच्यावर खलिस्तानी आतंकवाद्याकडून गोळीबाराचा प्रयत्न

गोळीबार करण्याचा प्रयत्न करताना आरोपी (डावीकडे) पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल (उजवीकडे)

अमृतसर (पंजाब) – येथील सुवर्ण मंदिरात शिखांची धार्मिक संस्था श्री अकाल तख्त साहिबने सुनावलेली शिक्षा भोगत असणारे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष आणि पंजाब राज्याचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीरसिंह बादल यांच्यावर एका शीख व्यक्तीकडून गोळीबार करण्याचा प्रयत्न झाला. या घटनेचा व्हिडीओदेखील समोर आला आहे. बादल येथील प्रवेशद्वारावर बसलेले असतांना येथे आलेल्या व्यक्तीने कमरेला लावलेले पिस्तूल काढून गोळीबार करण्याचा प्रयत्न केला असता बादल यांच्यासमवेत असलेल्यांनी हे पाहिले आणि त्यांनी या व्यक्तीला रोखले. त्यामुळे पिस्तुलातून सुटलेली गोळी भिंतीला लागली. त्यानंतर त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आणखी एक गोळीबार हवेत झाला. गोळीबार करणार्‍याला अटक करण्यात आली आहे. त्याचे नाव नारायण सिंह चौरा आहे. तो खलिस्तानी आतंकवादी असून त्याने यापूर्वी पाकिस्तानमध्ये जाऊन घातपात करण्याचे प्रशिक्षण घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्यावर यापूर्वी  बेकायदा कृत्यविरोधी प्रतिबंध कायद्याअंतर्गत (यू.ए.पी.ए. अंतर्गत) अनेक वेळा गुन्हे नोंद झाले आहेत. तसेच खलिस्तान आतंकवादासंबंधी कारवायांमध्ये सहभाग समोर आल्याने चौरा याला अटकही करण्यात आली होती.

१. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चौरा वर्ष १९८४ मध्ये पाकिस्तानात निघून गेला होता. तेथून तो आतंकवादी कारवायांसाठी पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे आणि स्फोटके यांची तस्करी करत असे. पाकिस्तानमध्ये असतांना त्याने गनिमी कावा यासंबंधी आणि देशविरोधी पुस्तके लिहिली आहेत. १९९० च्या दशकाच्या मध्यात तो भारतात परत आला आणि त्यानंतरही तो आतंकवादी कारवायांमध्ये सहभाग घेत राहिला.

२. पंजाबचे माजी मुख्यमंत्री बेअंत सिंह यांच्या मारेकर्यांना २००३-२००४मध्ये चंडीगडच्या बुरैल तुरुंगात भ्रमणभाष संच आणि इतर अवैध साहित्य पुरवल्याचा त्याच्यावर आरोप होता. पुढे चौरा याची वर्ष २०२२ मध्ये जामीनावर सुटका झाली. त्याच्यावर अमृतसर, रोपर, तरन तारन यासह पंजाबमधील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये गुन्हे नोंद आहेत. (‘इतके गंभीर देशविरोधी गुन्हे असतांना त्याला आतापर्यंत फाशीची शिक्षा का झाली नाही ?’, असा प्रश्‍न उपस्थित होतो. यातून भारतात देशविरोधी गुन्हे करणार्‍यांना शिक्षा होत नाही आणि तो अधिकाधिक गुन्हे करू शकतो, असेच चित्र जगासमोर निर्माण होते, हे लज्जास्पद आहे ! – संपादक)

संपादकीय भूमिका

  • पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार आल्यापासून खलिस्तान समर्थक आणि आतंकवादी यांच्या कारवायांमध्ये वाढ झाली आहे. शिखांचे पवित्र स्थान असणार्‍या सुवर्ण मंदिरात राज्याच्या माजी उपमुख्यमंत्र्यांची दिवसाढवळ्या हत्या करण्याचा प्रयत्न केला जातो, यातून कायदा आणि सुव्यवस्थेची स्थिती लक्षात येते !
  • एरव्ही वर्ष १९८४ मधील सुवर्ण मंदिरातील खलिस्तानी आतंकवाद्यांच्या विरोधात केलेल्या सैन्य कारवाईचा अजूनही विरोध करणार्‍या शिखांना याच सुवर्ण मंदिरात बादल यांच्या हत्येचा खलिस्तान्याकडून झालेला प्रयत्न मान्य आहे का ? कि त्यांच्या दृष्टीने खलिस्तानी करतात ते योग्य आणि त्यांच्या विरोधात पोलीस आणि सैन्य यांनी कारवाई केली, तर ती चुकीची, असे आहे का ?