मागील भागात आपण ब्रह्मोत्सव सोहळ्याला जाणार्या साधकांचे नियोजन करणार्या साधकांना शिकायला मिळालेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या. आता आपण ब्रह्मोत्सवासाठी जात असतांना आणि प्रत्यक्ष ब्रह्मोत्सव पहातांना साधकांना आलेल्या अनुभूती पाहूया.
(भाग ३)
१. सौ. श्रद्धा कांबळे
१ अ. कार्यक्रमाला जात असतांना
१. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ब्रह्मोत्सवाला जातांना कडक ऊन होते; मात्र ‘गुरुदेवांचे दर्शन होणार’, या विचाराने मला उन्हाचा त्रास झाला नाही.
२. आमची निवासव्यवस्था कुडाळ येथे सौ. मंजुषा खाडये यांच्या घरी केली होती. त्या वेळी आम्हाला त्यांच्या घरात शांतता आणि चैतन्य जाणवलेे.
(ब्रह्मोत्सवासाठी जाणार्या पुणे जिल्ह्यातील साधकांसाठी कोल्हापूर, कुडाळ इत्यादी ठिकाणी निवासव्यवस्था केली होती. कुडाळ येथील सौ. मंजुषा खाडये (सद़्गुरु स्वाती खाडये यांच्या वहिनी) यांच्या घरी काही साधकांची निवासव्यवस्था केली होती. सद़्गुरूंचे घर असल्यानेे तेथे चैतन्य जाणवले.)
१ आ. कार्यक्रम पहात असतांना
१. सर्व तीर्थक्षेत्रे गुरुदेवांच्या चरणांपाशी असून ‘आज त्या तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडले’, असे मला वाटले.
२. सौ. अस्मिता आवटी
२ अ. कार्यक्रमाला जाण्यापूर्वी
१. सोहळ्याला जाण्यापूर्वी माझी मान आणि गुडघे पुष्कळ दुखत होते. औषधोपचार करूनही गुण येत नव्हता. त्या वेळी ‘कितीही त्रास झाला, तरी आपल्याला ब्रह्मोत्सवाला जायचेच आहे’, हा एकच विचार माझ्या मनात होता.
२ आ. कार्यक्रम पहात असतांना
१. मला कार्यक्रम पहातांना सतत भावाश्रू येत होते.
२. गुरुदेवांना पाहून ‘मी वैकुंठ लोकांमध्ये श्रीमहाविष्णूचेच दर्शन घेत आहे’, असे मला वाटत होते. ‘गुरुदेवांकडून मोठ्या प्रमाणावर चैतन्याचा प्रवाह माझ्याकडे प्रक्षेपित होत आहे. त्यामुळे माझ्या संपूर्ण देहाची शुद्धी होऊन देह फुलाप्रमाणे हलका आणि निर्मळ होऊन गुरुदेवांच्या चरणी अर्पण होत आहे’, असे मला जाणवलेे.’
३. सौ. सुषमा चंदुरकर
३ अ. कार्यक्रम पहात असतांना
१. ‘सोहळ्यात गुरुदेवांचे दर्शन झाल्यावर ‘साक्षात् परमेश्वर आपल्यासाठी पृथ्वीवर अवतरला आहे’, असे वाटून त्यांच्याप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
२. ‘कार्यक्रमस्थळी उष्णता जाणवत आहे’, असा विचार एक क्षणभरच माझ्या मनात आला आणि ‘मला देहभान विसरून गुरुदेवांचे दर्शन घ्यायचे आहे’, या विचाराने मला शांत वाटले.
३. गुरुदेवांच्या कृपेने संपूर्ण ब्रह्मोत्सवामध्ये मला पुष्कळ आनंद जाणवला. माझे मन स्थिर होते. ‘गुरुदेवांना पहातच रहावे आणि त्यांची मूर्ती हृदयात साठवून ठेवावी’, असे मला वाटत होते.
४. गुरुदेवांच्या दिव्य रथाचे दर्शन घेतांना ‘येणार्या आपत्काळात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंत आपल्याला शक्ती पुरवत आहे’, याची जाणीव होऊन मला पुष्कळ कृतज्ञता वाटली.’
४. सौ. कविता भरत कापसे
४ अ. कार्यक्रमाला जात असतांना
१. ‘आमच्या ‘बस’च्या पुढच्या काचेवर गुरुदेवांचे आमच्या दिशेने एक छायाचित्र लावले होते. त्यामुळे ‘गुरुदेव आपल्या समवेतच आहेत आणि ते आपल्याकडे पहात आहेत’, असे मला वाटत होते.
२. बसमध्ये ‘सर्व साधकांच्या समवेत जाण्यास मिळत आहे’, याचा मला आनंद होऊन डोळ्यांतून भावाश्रू येत होते. मला कृतज्ञता वाटत होती.
३. प्रत्यक्षात मी आश्रमात कधीही गेले नाही, ‘तेथील वातावरण कसे असते ?’ हे मला ठाऊक नाही. मी अन्य साधकांच्या माध्यमातून ‘आश्रम कसा असतो’, हे ऐकले होते; परंतु बसमध्ये सर्वांच्या समवेत बसल्यावर ‘मी जणू आश्रमातच बसले आहे’, असे मला वाटत होते.
४ आ. कार्यक्रम पहात असतांना
१. सोहळ्याच्या ठिकाणी कमानीवर श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांची भावावस्थेत असलेली छायाचित्रे पाहून माझ्या डोळ्यांतून पुष्कळ वेळ भावाश्रू येत होते.
२. ‘प.पू. गुरुमाऊलींचा रथ पाहून तो आकाशातूनच पृथ्वीवर आला आहे’, असे मला वाटले.
३. रथारुढ प.पू. गुरुदेवांना पाहून ‘आज आपला उद्धार झाला’, असे मला वाटले.
४. माझे यजमान मला घराच्या बाहेर एकटीला कधीच जाऊ देत नाहीत; पण आज गुरुदेवांच्या कृपेने मी इतर साधकांसह शेकडो किलोमीटरचा प्रवास करू शकले, हीच माझ्यासाठी मोठी गुरुकृपा आहे.’
५. सौ. राजश्री अरुण खोल्लम
अ. ‘आम्हा सर्व साधकांना ‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांचे अनमोल अन् अलौकिक दर्शन झाले आणि ते दृश्य आमच्या चित्तावर कोरले गेले.
आ. श्रीसत्शक्ति सौ. सिंगबाळ भक्तीसत्संगात नेहमी सांगतात, ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव प्रत्येक साधकाच्या हृदयात आहेत.’ साधकांनी ‘सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेव प्रत्येक साधकाच्या समवेत आहेत’, याची या सोहळ्यामध्ये प्रचीती घेतली.’
६. सौ. प्रीती कुलकर्णी
अ. ‘आमच्या बसमध्ये काही धर्मप्रेमी, साधना-सत्संगातील जिज्ञासू, साधक आणि त्यांचे नातेवाईक होते. सर्वांचे खाणे-पिणे आणि निवासव्यवस्था पाहून एका जिज्ञासूंनी (सौ. माधवी गोखले यांनी) पुढील भावपूर्ण प्रतिक्रिया व्यक्त केली. ‘एवढे सुंदर नियोजन केले आहेे की, आम्हीसुद्धा आतापर्यंत कधीच कोणत्या सहलीचे असे नियोजन करू शकलो नाही.’
आ. सोहळ्याहून परत आल्यावर ‘रथोत्सव कसा अनुभवला ?’, हे साधकांनी सत्संगात भावविभोर होऊन सांगितले. ते ऐकतांना पुन्हा एकदा माझी भावजागृती झाली. त्या वेळी ‘मीच ते सर्व अनुभवत आहे’, असे मला जाणवत होते.
इ. ब्रह्मोत्सवाला गेलेले जिज्ञासूही आता मनापासून सेवा करत आहेत. ते स्वतःहूनच पुढाकार घेऊन ‘त्यांच्या जवळच्या भागात जाऊन वर्गणीदार बनवणे, हस्तपत्रके देणे आणि फलक लिखाण करणे’, अशा सेवा करत आहेत. सोहळा पाहून आल्यावर त्यांच्यातील हा पालट प्रकर्षाने जाणवला.
ई. ब्रह्मोत्सवाच्या निमित्ताने ‘अगदी बारकाव्यानिशी आणि वस्तूनिष्ठ पूर्वनियोजन कसे करायचे ?’, हे पू. (सौ.) मनीषाताईंच्या मार्गदर्शनातून आम्हाला शिकायला मिळालेे.
‘गुरुदेवा, तुमच्या प्रत्यक्ष दर्शनाला कधी येता आले नाही; परंतु या सोहळ्याच्या माध्यमातून आपली कृपा आणि चैतन्य आपण या जिवाला अनुभवायला दिलेत, याबद्दल मी आपल्या पावन चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.’
७. सौ. अनुराधा तागडे (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६९ वर्षे)
७ अ. ‘प.पू. गुरुदेवांचे स्थुलातून दर्शन होणार’, अशी पूर्वसूचना मिळणे : ‘ब्रह्मोत्सव सोहळ्याच्या एक मास आधीपासून मला ‘प.पू. गुरुदेवांचे स्थुलातून दर्शन होणार आहे. गुरुदेवांना भेटण्याची संधी मिळणार आहे’, असे जाणवत होते. जेव्हा मला सोहळ्यासाठी गोव्याला जाण्याचा निरोप मिळाला, तेव्हा ‘मला जाणवलेली ती पूर्वसूचना होती’, असे माझ्या लक्षात आलेे. तेव्हा मला गुरुदेवांप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली.
७ आ. कार्यक्रम पहात असतांना
७ आ १. सोहळा पहातांना डोळ्यांचे पारणे फिटणे : गुरुदेव रथारूढ होऊन साधकांना दर्शन देत असतांना माझी पुष्कळ भावजागृती झाली. माझ्या डोळ्यांतील अश्रू थांबतच नव्हते. गुरुदेवांच्या रथावर पुष्पवृष्टी होतांना ‘सर्व देवीदेवता हा सोहळा पहाण्यास उपस्थित आहेत आणि ते गुरुदेव, श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्यावर पुष्पवृष्टी करत आहेत’, असे मला जाणवले. ते दृश्य पाहून माझ्या डोळ्यांचे पारणे फिटले.
७ आ २. श्रीसत्शक्ति (सौ.) सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ओंजळीत फुले घेऊन ती श्री गुरुचरणी अर्पण केली. त्या वेळी ‘मीही त्यांच्या ओंजळीतील एक फूल असून श्री गुरुचरणी समर्पित झाले आहे’, असे मला जाणवले.
७ आ ३. संतांना गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना पाहून भावजागृती होणे : सनातनचे ७३ वे (समष्टी) संत पू. प्रदीप खेमका (वय ६४ वर्षे) आणि त्यांच्या पत्नी सनातनच्या ८४ व्या (समष्टी) संत पू. (सौ.) सुनीता खेमका (वय ६३ वर्षे) यांना गुरुदेवांप्रती कृतज्ञता व्यक्त करतांना पाहून माझी भावजागृती झाली आणि ‘आपण किती अल्प पडत आहोत !’, याची जाणीव झाली.’
(क्रमश:)
सर्व सूत्रांसाठी दिनांक (१३.३.२०२४)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |