शेवाळवाडीतील ‘अरहम मॅनेंजमेंट इन्स्टिट्यूट’मधील प्रकार
प्राचार्य आणि संस्थेचे संचालक यांवर गुन्हा नोंद
पुणे – हडपसर येथील शेवाळवाडीतील ‘अरहम मॅनेंजमेंट इन्स्टिट्यूट’ या खासगी शिक्षण संस्थेमध्ये एम्.बी.ए.चे शिक्षण घेणार्या २२ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याची घटना घडली. संस्थेचे संचालक अनिल त्रिपाठी आणि प्राचार्य अमय देशपांडे यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ही घटना संस्थेच्या कार्यालयामध्ये १ ऑक्टोबर ते ३१ जानेवारी २०२४ या कालावधीमध्ये घडली आहे. या प्रकरणी पीडित विद्यार्थिनीने हडपसर पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केल्यानंतर तिला इन्स्टिट्यूटमधून काढण्यात आल्याचे समोर येत आहे.
पीडिता एम्.बी.ए.च्या तिसर्या वर्षात शिकत आहे. प्राचार्य देशपांडे आणि संचालक त्रिपाठी यांनी तिला कार्यालयामध्ये बोलावले. तिच्यासोबत अश्लील चाळे केले. विनयभंग केल्याचा प्रकार केला, असे पीडितेचे म्हणणे आहे. हडपसर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नीलेश जगदाळे म्हणाले, ‘‘पीडितेने १५ दिवसांपूर्वी तक्रार दिली आहे. त्यानुसार प्राचार्य आणि संस्थेचे संचालक यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा नोंद केला आहे; परंतु तिला महाविद्यालयातून काढून टाकले आहे, याची माहिती आम्हाला नाही.’’
संस्थेचे संचालक अनिल त्रिपाठी म्हणाले, ‘‘तक्रार करणार्या विद्यार्थिनीने आणि तिच्या सहकार्याने काही दिवसांपूर्वी वाद घालून कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली आहे. या कारणांतून तिचा प्रवेश रहित केला होता. त्या रागातून चुकीची तक्रार देऊन ती आमच्यावर दबाव आणत आहे.’’
संपादकीय भूमिका :असे वासनांध प्राचार्य आणि संस्था विद्यार्थ्यांना काय शिकवणार ? असा प्रश्न निर्माण होतो ! शैक्षणिक क्षेत्रामध्ये घडणार्या अशा घटना पहाता समाजाची नीतीमत्ता आणि नैतिकता किती खालच्या स्तराला गेली आहे, हे लक्षात येते ! |