टाळ-मृदंगाच्या गजरात न्हाऊन निघाली देवाची आळंदी…!
आळंदी (जिल्हा पुणे) – कार्तिकी एकादशीनिमित्त लाखो भाविक संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली संजीवन समाधी दर्शनाकरता २६ नोव्हेंबरला आळंदीमध्ये आले. नदीपलीकडील वैतागेश्वर लगत असणारा दर्शन मंडप वारकरी भाविकांनी पूर्ण भरून दत्त आश्रमालगत दर्शनरांग गेली होती. भाविकांकडून होत असलेला ज्ञानोबा-तुकारामांचा जयघोष आणि टाळ-मृदंगाचा आवाज यांमुळे आळंदी दुमदुमून निघाली होती. मध्यरात्रीच्या सुमारास ‘स्वकाम सेवा मंडळा’च्या सेवकांनी संपूर्ण देऊळवाडा धुवून स्वच्छ केला. घंटानाद झाल्यानंतर दुपारी १२.३० ते १.३० पर्यंत संजीवन समाधीवर ११ ब्रह्मवृंदांच्या मंत्रोच्चारात पवमान विधीवत् अभिषेक करण्यात आला. मुख्य गाभारा आणि देऊळवाडा आकर्षक फुलांच्या सजावटीने दरवळला होता. माऊलींच्या समाधीवर चांदीचा मुखवटा ठेवून पंचामृत अभिषेक करण्यात आला.
नाशिक येथील जोडपे मानाचे वारकरी !
या वेळी नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील अशोक लोखंडे आणि त्यांच्या पत्नीला मानाचा वारकरी होण्याचा मान मिळाला. या वेळी लोखंडे दांपत्याला आळंदी देवस्थानाच्या वतीने सन्मानित करण्यात आले.
शहरात सर्वत्र ज्ञानोबा माऊलींचा, हरिनामाचा जयघोष !
इंद्रायणी घाटावरती स्नानाकरता वारकर्यांनी प्रचंड गर्दी केली होती. वारकरी खांद्यावर पताका, डोक्यावर तुळशी वृंदावन, मृदंगाचा लयबद्धताल, टाळांचा नाद, फुगडी आणि नृत्य यांमध्ये रममाण झाले होते. अनेक संत-महात्मे आणि देवतांच्या पालख्या घेऊन ज्ञानोबा माऊलींच्या जयघोषात दिंड्या नगर प्रदक्षिणा पूर्ण करत होत्या. शहरात सर्वत्र ज्ञानोबा माऊलींचा, हरिनामाचा जयघोष ऐकू येत होता.