G20 Summit : भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले !

ब्राझिल येथील ‘जी-२०’ परिषदेत पंतप्रधान मोदी यांचा दावा

(‘जी २०’ म्हणजे १९ देश आणि युरोपीयन युनियन (यात २७ देश आहेत) यांचे अर्थमंत्री आणि मध्यवर्ती बँकेचे गव्हर्नर यांची संघटना.)

पंतप्रधान नरेंद्र मोदी

रिओ दि जानेरो (ब्राझिल) – भारताने १० वर्षांत २५ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढले आहे. आम्ही ८० कोटी लोकांना विनामूल्य धान्य देत आहोत. ५५ कोटी लोक विनामूल्य आरोग्य विम्याचा लाभ घेत आहेत. शेतकर्‍यांना आतापर्यंत २० अब्ज डॉलर (१ सहस्र ६८ सहस्र कोटी रुपये) दिले आहेत. जागतिक अन्नसुरक्षेत भारत योगदान देत आहे. मलावी, झांबिया आणि झिम्बाब्वे या देशांना अलीकडेच साहाय्य करण्यात आले आहे, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे आयोजित जी-२० शिखर परिषदेत बोलतांना दिली.

परिषदेच्या पहिल्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जागतिक नेत्यांसमवेत  द्विपक्षीय बैठका घेतल्या. पंतप्रधान मोदी यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन, ब्रिटनचे पंतप्रधान केयर स्टार्मर, इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी, पोर्तुगालचे पंतप्रधान लुईस मॉन्टेनेग्रो, इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रबोवो सुबियांटो आणि नॉर्वेचे पंतप्रधान जोनास गेर स्टोर यांच्याशी द्विपक्षीय सूत्रांवर चर्चा केली. पंतप्रधान मोदी यांनी अमेरिकेचे मावळते अध्यक्ष जो बायडेन यांचीही भेट घेऊन त्यांच्याशी अनौपचारिक चर्चा केली. ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी मोदी यांची भेट घेतल्यानंतर सांगितले की, पुढील वर्षी भारतासमवेत मुक्त व्यापार करारावर पुन्हा चर्चा चालू केली जाईल.

संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत भारत आणि अन्य देश का नाहीत ? – ब्राझिलच्या राष्ट्राध्यक्षांचा प्रश्‍न

ब्राझिलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांनी परिषदेत म्हणाले की, संयुक्त राष्ट्रांची स्थापना झाली, तेव्हा त्यात केवळ ५६ सदस्य होते. आज १९६ देश आहेत. संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत आज आफ्रिका खंड कुठे आहे ? दक्षिण अमेरिका खंडातील देशांचे प्रतिनिधित्व कुठे आहे ? आशिया कुठे आहे ? दक्षिण आफ्रिका, जर्मनी, भारत हे देश कुठे आहेत ?, असा प्रश्‍न उपस्थित केला.