J&K LG Manoj Sinha : आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांची घरे भुईसपाट केली जातील !

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली चेतावणी

जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा

बारामुल्ला (जम्मू-काश्मीर) – आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांची घरे भुईसपाट केली जातील, अशी चेतावणी जम्मू-काश्मीरचे उपराज्यपाल मनोज सिन्हा यांनी दिली आहे. यानंतर ‘जम्मू-काश्मीरमध्येही बुलडोझर कारवाईची सिद्धता केली जात आहे का ?’, अशी चर्चा चालू झाली आहे.

बारामुल्ला जिल्ह्यात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करतांना उपराज्यपाल सिन्हा म्हणाले की,

१. मी सुरक्षादलांना कोणत्याही निरपराध्यांना दुखापत न करण्याचे निर्देश दिले आहेत; परंतु दोषींना सोडले जाणार नाही. जर कुणी आतंकवाद्यांना आश्रय दिला, तर त्याचे घर भुईसपाट केले जाईल. यात कोणतीही तडजोड केली जाणार नाही. ही दडपशाही नसून न्यायाची मागणी आहे.

२. काही लोक आतंकवाद्यांना आश्रय देणार्‍यांवर अत्याचार होत असल्याची विधाने करतात. तथापि, हा अत्याचार नाही, तर न्यायाची मागणी आहे आणि असाच न्याय कायम राहील.

३. जर लोक आतंकवाद्यांना आश्रय देत असतील आणि ‘आम्ही त्यांच्यावर अन्याय करत आहोत’, असे म्हणत असतील, तर ते योग्य नाही.

४. या प्रदेशातील संपर्क सुधारण्यासाठी काम करणार्‍यांना मारण्याचा अधिकार कुणाला आहे का ? जर लोक अशा घटकांच्या विरोधात उभे राहिले नाहीत, तर ही परिस्थिती कधीही पालटणार नाही. केवळ औपचारिकतेसाठी विधाने करणारे त्यांच्यापेक्षा (आतंकवाद्यांपेक्षा) वाईट आहेत, असे माझे मत आहे.

संपादकीय भूमिका

केवळ घरे भुईसपाट करून उपयोग नाही, तर अशा देशद्रोह्यांना जलद गती न्यायालयात खटला चालवून भर चौकात फाशी दिली पाहिजे, तरच काश्मीरमधील जिहादी आतंकवाद लवकर नष्ट होईल !