हिंदु धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांना आगामी निवडणुकीत मतदान करा ! – प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज

विश्व हिंदु परिषद, पुणे महानगराच्या वतीने आयोजित ‘संत संगम’ कार्यक्रम !

प.पू. स्वामी गोविंददेव गिरि

पुणे – हिंदु धर्म हा सर्वधर्मसमभाव मानणारा आहे, कुणालाही न्यून लेखणारा, भेदभाव करणारा नाही; मात्र आपणच किती वेळा दगा सहन करायचा ? आजच्या परिस्थितीत हिंदु समाजाला एकत्र आणणे महत्त्वाचे आहे, आपण सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे, हे मान्य आहे; मात्र त्यासाठी आपण शिल्लक राहिले पाहिजे. यासाठी कोणत्याही राजकीय पक्षाचा विचार न करता आपल्या हिंदु धर्माचे रक्षण करणार्‍या उमेदवारांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करा, असे आवाहन ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यास अयोध्या’चे कोषाध्यक्ष प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांनी केले. विश्व हिंदु परिषद पुणे महानगराच्या वतीने स.प. महाविद्यालयाच्या ‘लेडी रमाबाई हॉल’मध्ये आयोजित ‘संत संगम’ कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. या वेळी भंते हर्षवर्धन शाक्य, ज्ञानी अमरजीत सिंह, ह.भ.प.चिदंबरेश्वर साखरे महाराज, १००८ किन्नर आखाडा महामंडलेश्वर दीपाजी नंदगिरी जगावली माताजी, श्री महानुभव पंथाचे रविराज दादा पंजाबी आदी उपस्थित होते.

पुढे बोलतांना प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज म्हणाले की, देशात समान नागरी कायदा असणे आवश्यक आहे. शिवरायांचा विचार देशात रुजणे महत्त्वाचे आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वरांचे पसायदान हाच हिंदुत्वाचा जाहीरनामा असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक करतांना पश्चिम महाराष्ट्र प्रांत मंत्री किशोर चव्हाण म्हणाले की, हिंदू बहुसंख्यांक आहेत, तोपर्यंतच देश आणि राज्यघटना सुरक्षित असणार आहे, यांची जाणीव सर्वसामान्य नागरिकांमध्ये निर्माण होण्यासाठी आपला हा उपक्रम आहे.