नवी देहली – येथील राऊस एव्हेन्यू न्यायालयाने राष्ट्रीय जनता दलाचे प्रमुख लालू प्रसाद यादव, त्यांचे पुत्र आणि पक्षाचे नेते तेजस्वी यादव अन् तेजप्रताप यादव यांना ‘नोकरीसाठी भूमी’ (लँड फॉर जॉब स्कॅम) या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी जामीन संमत केला. विशेष न्यायमूर्ती विशाल गोगणे यांनी प्रत्येकी १ लाख रुपयांच्या जातमुचलक्यावर तिघांनाही जामीन संमत केला, तसेच या प्रकरणाच्या तपासाच्या वेळी त्यांना अटक झाली नसल्याचे नमूद केले.
काय आहे प्रकरण ?
हे प्रकरण वर्ष २००४ ते २००९ या कालावधीत लालू यादव रेल्वेमंत्री असतांनाचे आहे. यांतर्गत मध्यप्रदेशातील जबलपूर येथील रेल्वेच्या पश्चिम मध्य विभागात केलेल्या गट-डी नियुक्त्यांशी संबंधित आहे. यामध्ये रेल्वे खात्यात नोकरी मिळण्यासाठी यादव यांच्या कुटुंबियांच्या नावाने भूमी देण्याची लाच मागितल्याचे आरोप आहेत.