Monkeypox Delhi : देहलीतील रुग्ण ‘मंकीपॉक्स’बाधित असल्याचे स्पष्ट !

  • रुग्ण अलगीकरणात !

  • केंद्राकडून राज्यांना सूचना !

नवी देहली – देशात ‘मंकीपॉक्स’चा पहिला रुग्ण आढळून आल्यानंतर केंद्र सरकारने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना संशयित रुग्णांची तातडीने तपासणी करण्याचा आदेश ९ सप्टेंबरला दिला. याविषयी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने मार्गदर्शक सूचना प्रसारित केल्या. ८ सप्टेंबरला देहलीत आढळून आलेला रुग्ण ‘मंकीपॉक्स’बाधित असल्याचे स्पष्ट झाले असून त्याला अलगीकरणात ठेवण्यात आले आहे.

‘संशयित, तसेच पुष्टी झालेल्या रुग्णांसाठी अलगीकरणाची सुविधा उपलब्ध आहे का ?’, याची पडताळणी करण्याचे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. ९ सप्टेंबरला राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेश यांना पाठवलेल्या पत्रात केंद्रीय आरोग्य सचिव अपूर्व चंद्रा यांनी ‘नागरिकांमध्ये अनावश्यक भीती निर्माण होणार नाही’, याची दक्षता घेण्यासही सांगितले आहे. भारतात ‘मंकीपॉक्स’चा कोणताही नवीन रुग्ण आढळलेला नसून आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून असल्याचेही चंद्रा यांनी स्पष्ट केले. त्यांनी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश यांना सार्वजनिक आरोग्य सुविधांच्या सिद्धतेचा आढावा, तसेच रुग्णालयांमधील अलगीकरण सुविधा, त्यासाठी आवश्यक असलेली सामुग्री, तसेच प्रशिक्षित मनुष्यबळाची उपलब्धता सुनिश्‍चित करण्यास सांगितले आहे. राज्य आणि जिल्हा स्तरावरील ‘एकात्मिक रोग सर्वेक्षण कार्यक्रमां’तर्गत येणार्‍या सर्वेक्षण पथकांना याकडे लक्ष केंद्रित करण्यास सांगण्यात आले आहे.

८ सप्टेंबरला आढळून आलेल्या संशयित रुग्णाच्या चाचण्यांचे निष्कर्ष ९ सप्टेंबरला हाती आले. त्यातून अलीकडेच ‘मंकीपॉक्स’ची साथ असलेल्या देशातून परतलेल्या या व्यक्तीमध्ये ‘वेस्ट आफ्रिकन क्लॅड -२’ या विषाणूचा संसर्ग झाल्याचे स्पष्ट झाले; मात्र जागतिक आरोग्य संघटनेने ‘साथ’ घोषित केलेला ‘क्लॅड -२’ विषाणू आढळून आला नसल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.

केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रसारित केलेल्या महत्त्वाच्या सूचना

१. सार्वजनिक आरोग्य यंत्रणेची सिद्धता तपासा.

२. ‘मंकीपॉक्स’ आजाराविषयी जनजागृती करा.

३. रुग्णालयातील अलगीकरण कक्षांचा आढावा घ्या.

४. रुग्णांच्या सुरक्षित वाहतुकीसाठी सज्ज रहा.

५. आरोग्य कर्मचार्‍यांना योग्य प्रकारे प्रशिक्षित करा. जिल्हास्तरावर सिद्धतेचा आढावा घ्या.