केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक यांसह ७ लाचखोर अधिकार्‍यांना मुंबईत अटक !

मुंबई – केंद्रीय वस्तू आणि सेवा कर विभागाच्या ७ लाचखोर अधिकार्‍यांच्या मुसक्या केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने आवळल्या आहेत. यामध्ये केंद्रीय वस्तू आणि सेवा विभागाचे अतिरिक्त आयुक्त, अधीक्षक, सहआयुक्त आदी मोठ्या पदांवरील अधिकार्‍यांचा समावेश आहे. केंद्रीय अन्वेषण न्यायालयाने या सर्वांना १० सप्टेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

वस्तू आणि सेवा कर विभागाचे मुंबई (पश्चिम)चे अतिरिक्त आयुक्त दीपक कुमार शर्मा, अधीक्षक सचिन गोकुळका, अधीक्षक बिजेंदर जानवा, अधीक्षक निखिल अग्रवाल, अधीक्षक नितीनकुमार गुप्ता, सहआयुक्त राहुल कुमार, सनदी लेखापाल राज अग्रवाल यांसह अभिषेक मेहता नावाच्या खासगी व्यक्तीला केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली आहे. एका खासगी व्यावसायिकाकडून त्याच्यावर गुन्हा नोंद न करण्यासाठी या अधिकार्‍यांनी ८० लाख रुपयांची मागणी केली होती. त्यामध्ये ६० लाख रुपयांपर्यंत तडजोड झाली. त्यांतील ३० लाख रुपये हवालामार्गे त्यांनी घेतले. उर्वरित पैसे घेतांना त्यांना केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने अटक केली. या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेने ९ ठिकाणी धाड टाकून महत्त्वाची कागदपत्रे कह्यात घेतली आहेत.