पुण्यातील मुसळधार पावसामुळे पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी भारतीय सैन्याची तुकडी तैनात !

भारतीय सैन्याची तुकडी पूरग्रस्त भागाची पहाणी करतांना

पुणे – येथील संततधार पाऊस आणि खडकवासला धरणातून पाण्याचा वाढीव विसर्ग चालू केल्याने एकतानगरसह अनेक भागांत पाण्याच्या पातळीत लक्षणीय वाढ झाली आहे. ४ ऑगस्ट या दिवशी ४५ सहस्र क्युसेक पाणी सोडल्यामुळे एकतानगर आणि द्वारका सोसायटीमध्ये पूर आला आहे. त्यामुळे भारतीय सैन्यदलाने एकतानगरमधील पूरग्रस्तांना साहाय्य करण्यासाठी एक ‘पूरग्रस्त साहाय्य तुकडी’ त्वरित तैनात केली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाने ४ ऑगस्टला सकाळी भारतीय सैन्याच्या  साहाय्याची मागणी केल्यानंतर त्वरित ही कार्यवाही करण्यात आली, तसेच विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी एकतानगर परिसराला भेट दिली. अधिकार्‍यांनी नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश अधिकार्‍यांना दिले. पूर आलेल्या भागातील वीजपुरवठा खंडित करण्यात आला आहे.

पूरग्रस्त भागात तैनात केलेल्या या तुकडीत अनुमाने १०० सैनिकांचा समावेश आहे. ही सैन्याची तुकडी आल्यानंतर, बचावतुकडीच्या प्रमुखाने (कमांडर) परिस्थितीचा आढावा घेतला आणि नागरी प्रशासनासह प्राथमिक पहाणी केली.

नागरी प्रशासनाच्या सहकार्याने, भारतीय सैन्याच्या या तुकडीने जलमय भागातील सर्व इमारती आणि घरे रिकामी करण्यास चालू केले असून रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित केले जात आहे. पूरग्रस्त भागाचा परिणामकारक आढावा घेऊन प्रभावी उपाययोजना करण्यासाठी टेहळणी करण्यात येत आहे. आवश्यकतेनुसार साहाय्य करण्यासाठी अतिरिक्त राखीव साहाय्य तुकड्याही सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.