मुंबई, ५ ऑगस्ट (वार्ता.) – कोल्हापूर आणि सांगली येथे प्रतिवर्षी होणारी पूरस्थिती लक्षात घेऊन पूरस्थितीची पूर्वकल्पना देणारी यंत्रणा उभारण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. यासाठी जागतिक बँकेकडून निधी प्राप्त होणार आहे, अशी माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
आपत्ती व्यवस्थापन विभाग, जलसंपदा विभाग आणि ‘महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन’ हे यासाठी एकत्रितरित्या काम करणार आहेत. सध्या भारतीय हवामान विभागाकडून प्राप्त होणार्या संदेशावरून भ्रमणभाषद्वारे संदेश पाठवणे, भोंगा वाजवणे आदी यंत्रणा कार्यरत आहेत. नवीन कार्यरत करण्यात येणार्या पूर्वसूचना प्रणालीद्वारे पूरस्थिती, भूकंप आदी नैसर्गिक आपत्तींची पूर्वसूचना मिळेल, अशी यंत्रणा कार्यान्वित असेल. यामुळे आपत्ती येण्याच्या पूर्वी या दोन्ही जिल्ह्यातील संबंधित ठिकाणच्या नागरिकांना सतर्कतेचा संदेश देण्यात येणार आहे. आवश्यकतेनुसार नागरिकांना सुरक्षितस्थळी हालवता येईल. त्यामुळे जीवितहानी टाळता येईल. सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांत प्रायोगिक तत्त्वावर हा प्रयोग केला जाणार असून त्यानंतर संपूर्ण राज्यात अशा यंत्रणा उभारणार आहे.