यंदाच्या ‘चॅम्पियन ट्रॉफी’चा आयोजक पाकिस्तान आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने या स्पर्धेचे वेळापत्रक काही दिवसांपूर्वीच ‘आयसीसी’कडे, म्हणजे आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळाकडे सादर केले आहे. या नियोजनानुसार भारताचे साखळी फेरीतील सामने कराची येथे आणि जर भारत उपांत्य अन् अंतिम सामन्यापर्यंत गेला, तर तो सामना लाहोर येथे होणार आहे. पाकिस्तान क्रिकेट मंडळाने हे नियोजन ‘आयसीसी’कडे दिले असले, तरी अद्याप भारत सरकारने भारतीय संघाला चॅम्पियन स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्याची अनुमती दिलेली नाही. ‘चॅम्पियन ट्रॉफी’च्या आयोजनाची पहिली बैठक २२ जुलै या दिवशी श्रीलंकेत कोलंबो येथे पार पडली. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (‘बीसीसी’चे) सचिव जय शहा या बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत ‘चॅम्पियन ट्रॉफी’ स्पर्धेसाठी होणारा व्यय निश्चित करण्यात आला. भारतीय संघ या स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाणार कि नाही ? याविषयीचा निर्णयही या बैठकीत होईल, अशी शक्यता होती. प्रत्यक्षात मात्र याविषयी बैठकीत चर्चा झालीच नाही. त्यामुळे या स्पर्धेचा आयोजक पाकिस्तान क्रिकेट मंडळ अद्यापही द्विधा स्थितीत आहे. जागतिक क्रिकेट सामन्यांचे आयोजन ‘आयसीसी’ करत असली, तरी जगात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचाच दबदबा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ हे जगातील सर्वांत श्रीमंत क्रिकेट मंडळ आहे. त्यामुळे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला डावलून ‘चॅम्पियन ट्रॉफी’ची स्पर्धा होऊच शकत नाही आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट मंडळही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला डावलू शकत नाही. त्यामुळे भारताने चॅम्पियन स्पर्धेसाठी पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला, तर ‘आयसीसी’ला भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामने अन्य देशांमध्ये खेळवावे लागतील. त्यामुळे स्पर्धेचे यजमानपद असलेल्या पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे हात दगडाखाली आहेत.
एरव्ही खेळ हा खिलाडू वृत्तीनेच खेळायला हवा; मात्र प्रश्न जर राष्ट्रीयत्वाचा असेल, तर त्यापुढे क्रिकेट महत्त्वाचे नाही, ही भारताची भूमिका अतिशय योग्य आहे. खेळ हा खिलाडू वृत्तीने तेव्हाच खेळला जातो, जेव्हा प्रतिस्पर्ध्यामध्येही तशी वृत्ती असेल; परंतु भारतासमवेत असलेले सर्वच व्यवहार पाकिस्तान ‘जिहाद’ मानतो. एवढेच नव्हे, तर पाकच्या संघातील खेळाडू आणि तेथील नागरिकही भारतासमवेत क्रिकेटचा सामना खेळणे, हा ‘खेळ’ म्हणून न मानता ‘जिहादी युद्ध’ असेच मानतात. भारत-पाक क्रिकेटचा सामना झाल्यानंतर त्यात जर भारत विजयी झाला, तर पाकमध्ये अनेक जण रस्त्यावर उतरून त्या संघाचे नेतृत्व करणार्याचे छायाचित्र जाळतात आणि तोडफोडही करतात. त्यामुळे पाकिस्तानलाही त्याचप्रमाणे उत्तर देण्याविना पर्याय नाही. पाकिस्तानच्या आतंकवादी कारवाया आणि भारतीय खेळाडूंची सुरक्षितता यांमुळे भारत त्याच्या संघाला पाकिस्तानमध्ये पाठवण्याची मुळीच शक्यता नाही. ‘स्वत:च्या देशामध्ये आलेल्या खेळाडूंची सुरक्षा राखू न शकणे’, ही पाकिस्तानची जगात स्थिती आहे आणि याला अन्य कुणी नव्हे, तर पाकिस्तान स्वत:च उत्तरदायी आहे.
बीमोड भारतालाच करावा लागेल !
जम्मू-काश्मीरमध्ये पाकिस्तानकडून सातत्याने होत असलेल्या आतंकवादी कारवायांमुळे भारताने वर्ष २००८ पासून पाकिस्तानमध्ये भारतीय संघाला न पाठवण्याचा निर्णय घेतला. तेव्हापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विसंघीय सामने बंद आहेत. ‘आयसीसी’कडून आयोजित स्पर्धा आणि त्याही पाकिस्तान व्यतिरिक्त अन्य देशांमध्ये असेल, तरच भारतीय संघ पाकिस्तानच्या संघाशी क्रिकेट खेळत आहे. यापूर्वीचे ‘चॅम्पियन ट्रॉफी’च्या स्पर्धेलाही भारताने पाकिस्तानमध्ये जाण्यास नकार दिला. त्यामुळे नाईलाजाने ‘आयसीसी’ला भारत-पाकिस्तानमधील हे सामने श्रीलंकेमध्ये खेळवावे लागले. वर्ष २००९ मध्ये पाकिस्तानमधील गद्दाफी स्टेडियममध्ये पाकिस्तान आणि श्रीलंका यांच्यामध्ये सामना चालू असतांना आतंकवाद्यांनी आक्रमण केले. तेव्हापासून अन्य देशांनीही पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यासाठी जाण्यास नकार दिला. वर्ष २००९ पासून वर्ष २०१५ पर्यंत पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय सामने झालेले नाहीत. वर्ष २०१५ नंतर काही देशांनी त्यांचा संघ पाकिस्तानमध्ये पाठवला; मात्र अद्यापही अनेक देश त्यांचा संघ पाकिस्तानमध्ये पाठवण्यास सिद्ध नाहीत. खरेतर याची लाज पाकिस्तानमधील राज्यकर्त्यांना वाटायला हवी. जागतिक पातळीवरील या नाचक्कीची थोडीतरी लाज वाटत असती, तर पाकिस्तानने आतंकवादी कारवाया थांबवल्या असत्या; मात्र पाकिस्तान अद्यापही सुधारलेला नाही आणि सुधारण्याची तीळमात्र शक्यताही नाही. त्यामुळे पाकिस्तानमधील आतंकवादाचा बीमोड भारताला शक्तीबळानेच करण्याविना पर्याय नाही.
‘चॅम्पियन ट्रॉफी’मध्ये जागतिक क्रिकेटमधील अव्वल १० संघ सहभागी होतात. त्यामुळे या स्पर्धेलाही ‘वर्ल्ड कप’प्रमाणेच महत्त्व आहे. या स्पर्धेसाठी येणार्या प्रेक्षकांचाही ओघ मोठ्या प्रमाणात असतो. यामुळे आयोजक देशामध्ये मोठ्या प्रमाणात आर्थिक उलाढाल होते आणि यजमान देशातील नागरिकांनाही याचा लाभ होतो. देशाच्या अर्थकारणालाही त्यामुळे गती मिळते, हे वास्तव आहे; मात्र यातील कोणत्याही कारणाने पाकिस्तान स्वत:ची धर्मांधता सोडायला सिद्ध नाही. पाकिस्तानच्या आतंकवादी कुरापतींमुळे वर्ष १९९१ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी भारत-पाकिस्तान यांचा सामना मुंबईमध्ये खेळू देण्यास विरोध केला होता. ‘खेळ हा खेळाप्रमाणे खेळावा’, असे तत्त्वज्ञान पाजळणार्यांना तेव्हाही बाळासाहेबांनी ‘खेळाची भाषा करणार्यांनी पाकिस्तानने भारताच्या सीमेत घुसून किती भारतीय सैनिकांना गोळ्या घातल्या आहेत आणि त्यामुळे किती भारतीय स्त्रिया विधवा झाल्या आहेत, हे आठवून पहा’, असे ठणकावून सांगितले होते. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकर नाईक यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या या भूमिकेला विरोध केला होता; मात्र बाळासाहेब राष्ट्रीयत्वाच्या भूमिकेशी ठाम राहिले. कुणाचे खेळाचे मनोरंजन भागवण्यासाठी आणि आर्थिक लाभ मिळण्यासाठी आम्ही भारतीय सैनिकांचे बलीदान विसरणार नाही, अशी आपली भारतीय म्हणून भूमिका असायला हवी. त्यामुळे भारतीय संघाने पाकिस्तानमध्ये जाऊ नये, हीच राष्ट्रप्रेमी नागरिकांची इच्छा आहे. आताही पाकने अनेक आतंकवादी जम्मू-काश्मीरमध्ये घुसवले आहेत आणि ते भारतीय सैनिकांची हत्या करत आहेत. असे असतांना भारताने पाकमध्ये जाऊन क्रिकेटचा सामना खेळणे, हे संतापजनक होईल. त्यामुळे भारताने असे काही करण्यापेक्षा पाकिस्तानी आतंकवादाचे कंबरडे कायमचे मोडावे आणि पाकव्याप्त काश्मीर कह्यात घेऊन पाकिस्तानचा नकाशा जगाच्या नकाशातून पुसून भारतियांचे स्वप्न पूर्ण करावे, अशी राष्ट्रप्रेमींची अपेक्षा आहे !