कुणावरही अन्याय्य कारवाई होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणे हटवणार ! – मुख्यमंत्र्यांचे आश्‍वासन

विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात लढा देणार्‍या शिवप्रेमींवरील गुन्हे मागे घेण्याची हिंदु जनजागृती समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी !

पंढरपूर (सोलापूर), १८ जुलै (वार्ता.) – विशाळगडावरील अतिक्रमणाच्या विरोधात आंदोलन करणार्‍या शिवप्रेमींवर प्रशासनाकडून अन्याय्य कारवाई करत खोटे गुन्हे नोंद केले जात आहेत. हे गुन्हे तात्काळ मागे घेण्याची मागणी हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र आणि छत्तीसगड राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांनी राज्याचे मुख्यमंत्री श्री. एकनाथ शिंदे यांच्याकडे पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात भेट घेऊन केली.

हिंदु जनजागृती समितीचे प्रसिद्धीपत्रक –


या वेळी शिवसेनेचे मुख्य प्रतोद आणि आमदार श्री. भरतशेठ गोगावले उपस्थित होते. यावर मुख्यमंत्र्यांनी ‘आम्ही कुणावरही अन्याय होऊ देणार नाही, तसेच विशाळगडावरील सर्व अतिक्रमणही हटवू. केवळ विशाळगडच नव्हे, तर राज्यभरातील ज्या गड-दुर्गांवरील अतिक्रमणे झाली आहेत, ती सर्व हटवू. यासह सर्व गड-दुर्गांचे शासनाकडून संवर्धन अन् विकास करून त्यांचे पावित्र्य राखू, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. श्री. घनवट यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली.

या प्रसिद्धीपत्रकात पुढे नमूद करण्यात आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विशाळगडावर शेकडो अतिक्रमणे झाली आहेत. ती हटवण्यासाठी प्रशासनाने समयसमर्यादेत कारवाई केली नाही.

त्यामुळे शिवप्रेमींचा उद्रेक झाला; मात्र आंदोलन करणार्‍या गड-दुर्ग प्रेमींवर दरोड्यासारखी कलमे लावणे, तसेच अनेक निरपराध हिंदूंना अटक करणे, अत्यंत चुकीचे असून या प्रकरणी सर्व हिंदूंवरील गुन्हे तात्काळ मागे घ्यावेत. सध्या अतिक्रमण हटवण्याची चालू झालेली मोहीम सर्व अतिक्रमणे हटवूनच पूर्ण करावी, तसेच राज्यातील ज्या गडांवर अतिक्रमणे झाली आहेत, ती सर्व अतिक्रमणे शासनाने तात्काळ हटवावीत, अशा मागण्याही हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुख्यमंत्र्यांकडे या वेळी करण्यात आल्या.