पणजी, २७ डिसेंबर (वार्ता.) – कळंगुट येथे रस्त्यावर अस्वच्छपणे आणि अनधिकृतरित्या बिर्याणी विकणार्यांवर ‘अन्न आणि औषध प्रशासना’ने (फूड अँड ड्रग ॲथॉरिटी’ने (‘एफ्.डी.ए.’ने) २७ डिसेंबर या दिवशी कारवाई केली. ‘एफ्.डी.ए.’चे अधिकारी रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली धाड घालण्यात आली. अस्वच्छ आणि अनधिकृतपणे खाद्यपदार्थ विक्रीसाठी जागा देणार्या उपाहारगृहांवर यापुढे कारवाई करण्यात येणार असल्याची चेतावणी ‘एफ्.डी.ए.’ने दिली आहे.
याविषयी अधिक माहिती देतांना अधिकारी रिचर्ड नोरोन्हा म्हणाले, ‘‘कळंगुट येथे अनेक उपहारागृहांनी त्यांची लहानशी जागा बिर्याणी विक्रेत्यांना दिली आहे. हे बिर्याणी विक्रेते उपाहारगृहाच्या बाहेर रस्त्यावर बिर्याणी बनवून ती १०० रुपये या दराने विकत होते. सुमारे ५ – ६ ठिकाणी मोठ्या पातेल्यांमध्ये बिर्याणी सिद्ध करून ती विकली जात होती. बिर्याणी अस्वच्छ पद्धतीने बनवली जात होती आणि बिर्याणी विक्रेत्यांकडे ‘एफ्.डी.ए.’ किंवा पंचायत यांची अनुज्ञप्ती (परवाना) नव्हती. यापूर्वी अशा विक्रेत्यांवर कारवाई करण्यात आली होती; मात्र आता पर्यटन हंगाम चालू झाल्याने पुन्हा या विक्रेत्यांनी त्यांचा व्यवसाय चालू केला आहे. ‘एफ्.डी.ए.’ने खाद्यपदार्थ विक्रीसाठी वापरले जाणारे साहित्य कह्यात घेतले आहे.’’