‘सेक्युलर’चा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ नसून सर्वधर्मसमभाव आहे ! – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

हिंदुत्वाचा खरा संबंध भारतियत्वाशी, हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व !

नागपूर – हिंदु, हिंदुत्व, हिंदु जीवनपद्धत यांविषयी अनेक समज- अपसमज आहेत. हिंदुत्वाचा खरा संबंध भारतियत्वाशी आहे. भारतीयत्व हेच हिंदुत्व आहे अन् हिंदुत्व हेच राष्ट्रीयत्व आहे, तसेच ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ नसून ‘सर्वधर्मसमभाव’ आहे, असे विधान केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी येथे केले. माजी पंतप्रधान दिवंगत अटल बिहारी वाजपेयी यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त भाजपचे नवनिर्वाचित आमदार आणि मंत्री यांचा २५ डिसेंबर या दिवशी नितीन गडकरी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्या वेळी ते बोलत होते. भाजप, नागपूर महानगर आणि जिल्हा यांच्या वतीने ईश्वर देशमुख महाविद्यालयाच्या मैदानावर हा कार्यक्रम पार पडला.

कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कामगारमंत्री आकाश फुंडकर, आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि आमदार यांची उपस्थिती होती.

मंत्री नितीन गडकरी म्हणाले की, सर्वाेच्च न्यायालयाने निर्णय दिल्यानंतर ‘हिंदु वे ऑफ लाइफ’ हा हिंदुत्वाचा अर्थ सांगितलेला आहे; परंतु हिंदुत्वाचा खरा संबंध भारतियत्वाशी आहे. हिंदु समाजामध्ये उपासनापद्धती वेगळी असेल. कुणी भगवान बुद्ध, कुणी भगवान राम, तरकुधी येशू ख्रिस्त आणि अल्लाहची पूजा करत असतील; परंतु हे सर्व भारतीय आहेत. मधल्या काळात धर्माधर्मात वाद व्हावे म्हणून राजकीय मतांसाठी ‘सेक्युलर’ शब्दाचा वापर झाला; परंतु ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ ‘धर्मनिरपेक्ष’ असा नसून ‘सर्वधर्मसमभाव’ असा आहे. शब्दकोषामध्येही हाच अर्थ आहे. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलेले हे सूत्र हाच खर्‍या अर्थाने ‘सेक्युलर’ शब्दाचा अर्थ आहे.’’