मुंबई, २७ डिसेंबर – गुरु गोविंद सिंह यांनी देश, समाज, संस्कृती आणि धर्म यांच्या रक्षणासाठी संपूर्ण कुटुंबाचे बलीदान दिले. त्यांच्या संपूर्ण कुटुंबाच्या चरणी आपण नतमस्तक होतो. गुरु गोविंद सिंह यांचे दोन पुत्र साहेबजादे जोरावर सिंह आणि फतेह सिंह यांचे हौतात्म्य ‘शहीद वीर बाल’ दिवसाच्या निमित्ताने आपण नेहमीच स्मरणात ठेवूया, अशा शब्दांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. ‘वीर बाल दिवसा’चे औचित्य साधून गोरेगाव येथील गुरुद्वारामध्ये आयोजित एका विशेष कार्यक्रमात ते बोलत होते.
ते म्हणाले, ‘‘पुढील अनेक पिढ्यांपर्यंत आपल्याला गुरु गोविंद सिंह आणि त्यांचे दोन्ही पुत्र यांच्याकडून प्रेरणा मिळत राहील. त्यांच्या हौतात्म्याची कथा आपल्या भावी पिढ्यांपर्यंत पोचवणे, हे आपले दायित्व आहे.’’
या वेळी आमदार विद्या ठाकूर, कार्यक्रमाचे राष्ट्रीय प्रभारी शक्ती सिंह, संयोजक किरण पाटील, सहसंयोजक सुरींदर सिंह पुरी, सहसंयोजक राणी द्विवेदी, गुरुद्वारा कमिटीचे पदाधिकारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते.