जे.एन्.पी.ए. ते सागरी मार्ग प्रवास २५ मिनिटांत !
उरण – जे.एन्.पी.ए. बंदर ते मुंबईतील गेट वे ऑफ इंडिया हा प्रवास साधारण १ घंट्याचा आहे. हा प्रवास २५ मिनिटांत वातानुकूलित ‘ई-स्पीड’ बोटमधून फेब्रुवारीपासून करता येणार आहे. या प्रवासासाठी जादाचे दर आकारले जातील. त्यामुळे लाकडी प्रवासी बोटी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
भटक्या श्वानांच्या नसबंदीची मागणी !
कल्याण – कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या हद्दीत भटक्या श्वानांचा उपद्रव वाढला आहे. येथील तिघांना श्वानांनी चावे घेतले आहेत. त्यामुळे पालिकेच्या श्वान निर्बिजीकरण केंद्रातील भटक्या श्वान प्रतिबंधक पथकाने शहरातील भटक्या श्वानांना पकडून त्यांची नसबंदी करण्याची मोहीम हाती घ्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
संपादकीय भूमिका : भटक्या श्वानांमुळे होणार्या समस्या प्रशासनाला दिसत नाहीत का ?
विमानात धूम्रपान करणारा प्रवासी अटकेत !
मुंबई – अबूधाबी – मुंबई विमान प्रवासात धूम्रपान करणारा प्रवासी फजल महंमद ओट्टा पिलाकुल (वय २६ वर्षे) याच्या विरोधात सहार पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तो केरळमधील रहिवासी आहे. प्रवाशाने विमानातील शौचालयात जाऊन धूम्रपान केले. तेथे सिगारेटचे थोटूक सापडले.
रेल्वेकडून मुंबईत विशेष सेवा गाड्या !
मुंबई – नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने मुंबईत येतात. त्यांची गैरसोय टाळण्यासाठी रेल्वेने विशेष सेवा चालवण्याचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वे ४, तर पश्चिम रेल्वे ८ विशेष सेवा गाड्या चालवणार आहे. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्रीपासून १ जानेवारीच्या पहाटेपर्यंत प्रवाशांच्या सेवेत या गाड्या चालवण्यात येतील. या सर्व विशेष उपनगरी लोकल सर्व स्थानकांवर थांबतील.