पंकजा मुंडे यांचे मस्साजोग प्रकरणावर भाष्य !
कोल्हापूर – राज्याच्या पर्यावरणमंत्री पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा बीडच्या मस्साजोग प्रकरणावर भाष्य करत राज्याचे गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय देतील, असा ठाम विश्वास व्यक्त केला. प्रस्तुत प्रकरणात सर्वप्रथम मीच एस्.आय.टी. (विशेष अन्वेषण पथक) स्थापन करण्याची मागणी केली होती. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकरणात जातीने लक्ष घालून किंबहुना न्याय भूमिका घेऊन त्या माझ्या लेकराला न्याय देतील, असा मला विश्वास आहे, असे त्या म्हणाल्या.
मस्साजोगचे माजी सरपंच संतोष देशमुख यांची ९ डिसेंबर या दिवशी निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेचे राज्यभरात तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांचे विश्वासू वाल्मिक कराड यांचे नाव आल्यामुळे प्रकरणाची संवेदनशीलता वाढली आहे. या पार्श्वभूमीवर २६ डिसेंबर या दिवशी कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात दर्शनासाठी आलेल्या पंकजा मुंडे यांनी संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांना न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
पंकजा मुंडे मंदिराच्या प्रांगणात पत्रकारांशी बोलतांना म्हणाल्या की, त्या क्रूर प्रकरणाचा मी क्रूर संताप आणि निषेध व्यक्त केला आहे. मृत संतोष देशमुख माझा ‘बुथ प्रमुख’ होता. तो माझ्यासमवेत काम करत होता. त्याने एक चांगला सरपंच म्हणून काम केले आहे.