पाटवळ, सत्तरी (गोवा) येथे वन्यप्राण्यांची शिकार करतांना एकाचा मृत्यू झाल्याचे प्रकरण

  • शिकारीसाठी शस्त्रे बाळगणार्‍यांच्या शोधासाठी परिसरातील घरांची तपासणी चालू

  • पोलीस आणखी काही जणांना कह्यात घेण्याची शक्यता

वाळपई, २७ डिसेंबर (वार्ता.) – पाटवळ, सत्तरी येथे २४ डिसेंबरच्या मध्यरात्री वन्यप्राण्यांच्या शिकारीसाठी गेलेल्या तिघांपैकी एकाचा गोळी लागून मृत्यू झाल्याच्या घटनेच्या अन्वेषणाला वाळपई पोलिसांनी गती दिली आहे. वाळपई पोलिसांनी २७ डिसेंबर या दिवशी म्हाऊस, चिंचमळ या भागात शस्त्रांचा शोध घेण्यासाठी घरांची तपासणी चालू केली आहे. याविषयी पोलीस उपअधीक्षक जिवबा दळवी म्हणाले, ‘‘पाटवळ येथे घडलेले प्रकरण अत्यंत गंभीर स्वरूपाचे आहे आणि या प्रकरणी कुणाचीही गय केली जाणार नाही. पुढील काही दिवसांत या प्रकरणी आणखी काही जणांना पोलीस कह्यात घेण्याची शक्यता आहे.’’

ते पुढे म्हणाले, ‘‘पाटवळ येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या प्रकरणी कह्यात घेण्यात आलेला एक संशयित चिंचमळ येथे रहातो आणि त्याने दिलेल्या माहितीनुसार या भागात काही जण शिकारीसाठी अनधिकृतपणे शस्त्रे बाळगत आहेत. त्यामुळे चिंचमळ परिसरात घरांची तपासणी करण्यासाठी पोलिसांचे ५ गट सिद्ध करण्यात आले आहेत. या वेळी घरातील लोकांची माहिती घेतली जात आहे, तसेच घरामध्ये शिकारीसंबंधी काही माहिती मिळाल्यास ती गोळा केली जात आहे. पोलीस उपनिरीक्षकांच्या नेतृत्वाखाली एक गट सिद्ध केला असून याद्वारे शस्त्रे बाळगणार्‍यांची सर्व माहिती गोळा केली जात आहे. एखाद्या घरात शस्त्रे सापडल्यास संबंधित घरमालकावर कारवाई केली जाणार आहे. पाटवळ येथे वन्यप्राण्यांची शिकार केल्याच्या प्रकरणी कह्यात असलेल्या दोघांवर जुन्या भारतीय दंड संहितेचे कलम १२० अंतर्गत (हत्या करण्याचे षड्यंत्र रचणे) नव्याने गुन्हा नोंदवण्यात आला आहे. संबंधित मयत व्यक्तीला शिकारीसाठी कुणी पाठवले ? शिकारीचा लाभ कुणाला मिळणार होता ? शिकारीसाठी वाहन कुणी पाठवले ? शिकारीसाठी बंदूक कुठून आणली ? बंदुकीसाठी काडतूस कुठून आणले ? यासंबंधी सर्व माहिती गोळा करून संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. पोलीस या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार आहेत.’’