भक्तीमार्ग

भगवंतप्राप्तीचा अत्यंत सोपा आणि सहज सुलभ मार्ग !

‘हरिला भक्तीचे बंधन, घासितो नाथाघरी चंदन ।’ या भजनपंक्तीत सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांनी भक्तीचे मर्म उलगडले आहे. संत एकनाथांच्या घरी काम करणारा आणि जनाबाईला साहाय्य करणारा विठ्ठल त्यांच्या निस्सीम भक्तीमुळेच त्यांच्या घरी राबला. भक्त आपल्या भाव-भक्तीने देवाला जिंकतो आणि मग देवच भक्ताचा दास बनतो. ‘जो (देवापासून) विभक्त नाही, तो भक्त’, या वचनानुसार साधनेत देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवून त्याच्याशी एकरूप होणारा भक्तच ईश्वरप्राप्ती करून घेतो. या भवसागरातून पार पडण्यासाठी भक्तीयोगाची नितांत आवश्यकता आहे. भक्तीमार्ग हा भगवंतप्राप्तीचा अत्यंत सोपा आणि सर्वांनाच आचरणात आणता येणारा सहज सुलभ मार्ग आहे. (सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)

भक्तीयोगाची अष्टांगे

१. भाषाशुद्धी, म्हणजे अपशब्द टाळणे

२. परदारा आणि परद्रव्य यांपासून दूर रहाणे

३. सत्याचे प्रेम

४. प्राणीमात्रांविषयी दया

५. अपराध्याला क्षमा

६. शांतवृत्ती

७. दानधर्म

८. अभिलाषेचा त्याग आणि वैराग्याची जोपासना.

(सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)

सकाम भक्ती आणि दास्यभक्ती !

१. सकाम भक्ती : मूल ‘आई, आई’ म्हणत रडायला लागले की, आई द्राक्षे, बोरे, लिमलेट, चॉकलेट इत्यादी त्याला देते. मुलाच्या हातात एखादी वस्तू पडताच मूल त्यात तल्लीन होते आणि आईला विसरून जाते. तसेच माणूस ‘भगवान, भगवान’ असा धावा करायला लागला की, भगवंत त्याच्यावर सुखाचा वर्षाव करतो आणि मग तो माणूस भगवंतालाच विसरून जातो.

२. दास्यभक्ती : ‘मी भगवंताचा दास आहे, म्हणजे ‘माझे’ म्हणून जे काही आहे, ते सर्व भगवंताचे आहे’, अशी वृत्ती बनली पाहिजे. दास होण्यामध्ये लाचारी नाही. दास म्हणजे ज्ञानाचे दास्य. त्यामध्ये तेज आणि आनंद आहे. (सनातनचा ग्रंथ : सुगम भक्तीयोग)