न्यायशास्त्राचे प्रवर्तक महर्षि गौतम !

महर्षि गौतम यांनी मानव आणि समाज यांना शिस्तबद्ध ठेवण्यासाठी न्यायशास्त्राची रचना केली. महर्षि गौतम यांना न्यायशास्त्राचे प्रवर्तक मानले जाते. महर्षि गौतम हे वैदिक काळातील मंत्रद्रष्टा ऋषि होते. ऋग्वेदामध्ये त्यांच्या नावे अनेक सूक्त आहेत. महर्षि गौतम यांच्यासारखा त्याग आणि तपश्चर्या आपल्याला कुठेही पहायला मिळणार नाही !

महर्षि गौतम

महर्षि गौतम यांच्या भक्तीने अवतरलेले त्र्यंबकेश्वर ! 

नाशिकजवळील ब्रह्मगिरी पर्वत ही महर्षि गौतमांची तपोभूमी मानली जाते. वैदिक काळात एकदा महाभयंकर कोरडा दुष्काळ पडला, तरी महर्षि गौतमांच्या आश्रमाच्या परिसरात मात्र याच्या अगदी विरुद्ध स्थिती होती. त्यांचा आश्रम, तसेच आश्रमाच्या अवती-भोवतीच्या परिसरात दुष्काळ कुठेच शोधूनही सापडत नव्हता. आश्रमाच्या परिसरात आणि अवती-भोवती हिरवळ होती. हिरवीगार झाडे डोलत होती. आश्रमाच्या जवळच असलेले सरोवर पाण्याने तुडुंब भरलेले होते. महर्षींच्या तेजाचा आणि आध्यात्मिक सामर्थ्याचा हा प्रभाव होता. देश-विदेशातील माणसे आणि पशू-पक्षी यांना दयाळू अन् उदार अंतःकरणाच्या महर्षींनी आसरा दिला होता.

गोदावरीचे प्रकटीकरण

एकदा दुष्प्रवृत्त लोकांच्या कारस्थानामुळे महर्षि गौतम यांच्यावर गोहत्येचा आळ आला होता. त्यामुळे महर्षि गौतम निष्पाप असूनही त्यांनी भगवान शिवाची कठोर आराधना केली. महर्षि गौतमांच्या कठोर तपश्चर्येमुळे साक्षात् भगवान शिव प्रगट झाले. त्याचसमवेत त्या प्रदेशात साक्षात् गंगाही अवतरली. गंगा नदी ‘गौतमी’ या नावाने प्रवाहित झाली. ही गौतमीच पुढे गोदावरी म्हणून प्रसिद्ध झाली. गोदावरीला ‘दक्षिणेतील गंगा’, असे म्हटले जाते. तेथील चैतन्य अजूनही टिकून आहे; मात्र या सर्वांचे श्रेय निश्चितच महर्षि गौतम यांना जाते. खरंच अखिल मानवजातीच्या कल्याणासाठी त्यांनी किती केले आहे ! अशा महान गौतम ऋषींच्या चरणी मनोमन कृतज्ञता !

(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)


महर्षि गौतम यांचा अहल्येला शाप !

महर्षि गौतमांचा आश्रम पुष्कळ दिव्य भासत असे. देवतासुद्धा त्या आश्रमाची प्रशंसा करत असत. महर्षि गौतम यांनी पत्नी अहल्या हिच्या समवेत तेथे राहून बराच काळ तेथे तप केले. अहल्या ही विश्वातील अत्यंत रूपवान, नखशिखांत सौंदर्यशालिनी स्त्री होती. देवराज इंद्रही तिच्या या अनुपम सौंदर्यामुळे मोहित झाला होता. एक दिवस महर्षि गौतम आश्रमात नाहीत, हे इंद्राला कळले. तेव्हा ही संधी साधून इंद्र महर्षि गौतम यांचे रूप धारण करून तेथे आला. इंद्राचे खरे रूप अहल्या ओळखू शकली नाही. इंद्राने तिच्याशी दुर्व्यवहार केला. आश्रमाच्या द्वारापाशी त्याला तपोबल संपन्न महर्षि गौतम हातात समिधा घेऊन आश्रमात प्रवेश करतांना दिसले. देवराज इंद्राचा भयाने थरकाप उडाला. त्याच्या मुखमंडलावर खेद पसरला. गौतम ऋषींनी त्याच क्षणी दुराचारी इंद्राला ‘देहाला सहस्रो भोके पडतील’, असा शाप दिला. त्यांनी अहल्येला ‘तू इथे कित्येक सहस्र वर्षांपर्यंत केवळ वायूभक्षण करत उपवास करून कष्ट सहन करत शिळा होऊन पडून रहाशील’, असा शाप दिला. स्वत:कडून नकळत झालेल्या चुकीविषयी पश्चात्ताप व्यक्त करीत ती पुन:पुन्हा महर्षींना आळवू लागली. त्या वेळी महर्षि गौतमांना जाणीव झाली की, ‘यात अहल्येची काही चूक नाही. तिने इंद्राला ओळखले नसल्यामुळेच तिच्याकडून ही चूक घडली आहे.’ तेव्हा महर्षि गौतमांनी उ:शाप दिला.

अहल्येचा उद्धार !

महर्षि गौतम म्हणाले, ‘‘या पृथ्वीतलावर भगवान विष्णु श्रीरामरूपात अवतार धारण करणार आहेत. जेव्हा श्रीराम या घोर वनात पदार्पण करतील, त्या वेळी त्यांच्या दिव्य पदस्पर्शाने तू शापमुक्त होशील. त्यांचे आदरातिथ्य करण्याने तुझे लोभ-मोह आदी दोष दूर होतील. त्या वेळी तू तुझे पूर्वीचे शरीर धारण करशील.’’ त्यांनी इंद्रालाही उ:शाप दिला, ‘‘प्राय:श्चित म्हणून तपश्चर्या कर. त्याने तुझ्या देहावरील सहस्रो भोके सहस्रो नेत्र होतील.’’

अहल्या निष्प्राण शिळा होऊन केवळ वायूभक्षण करत जगत होती. प्रभु श्रीरामचंद्रांच्या अवतारधारणाची आणि स्वतःच्या शापमुक्तीची वाट पहात सहस्रो वर्षे लोटली. त्रेतायुगात भगवान श्रीविष्णूने प्रभु श्रीरामचंद्रांच्या रूपात अवतार धारण केला. पुढे महर्षि विश्वामित्र त्यांना ऋषींच्या यज्ञरक्षणासाठी म्हणून विविध ठिकाणी ऋषींच्या आश्रमांमध्ये घेऊन गेले होते. महर्षि विश्वामित्रांनी प्रभु श्रीराम आणि लक्ष्मण यांना मिथिलेच्या उपवनात नेले. तेथे त्यांना एक प्राचीन आश्रम दिसला. तो आश्रम अत्यंत रमणीय असूनही निर्जन भासत होता. महातपस्वी विश्वामित्र प्रभु श्रीरामचंद्रांना म्हणाले, ‘‘हे महातेजस्वी श्रीरामा ! आता तू पुण्यकर्मा महर्षि गौतमांच्या या आश्रमात चल आणि त्या देवरूपिणी अहल्येचा उद्धार कर.’’ श्रीरामांनी त्यांच्या दिव्य दृष्टीने पाहिले की, महासौभाग्यशालिनी अहल्या आपल्या तपस्येने दैदिप्यमान होत आहे, जणू तपःज्वालाच ! शिळा रूपातील अहल्येला श्रीरामांच्या चरणांचा स्पर्श झाला. श्रीरामांचे चरणस्पर्श होताच ती शापमुक्त झाली. श्रीरामांचे दर्याद्र आणि वात्सल्यमय शब्द तिच्या कानी पडले, ‘ऊठ अहल्ये, ऊठ !’ अहल्या हळूहळू पुन्हा मानवी देहरूपात येऊ आली. त्या वेळी देवतांच्या दुंदुभी वाजू लागल्या. आकाशातून फुलांची वृष्टी होऊ लागली. गंधर्व आणि अप्सरा यांच्या नृत्यगायनाचा महान उत्सव साजरा केला गेला. सर्व देवतांनी तिची प्रशंसा करून तिला आशीर्वाद दिले. श्रीरामांनी ते स्थानही पुनर्जीवित केले. महर्षि  गौतम आश्रमात परत आले.  गौतम ऋषीरूपी परमतपस्वी भक्ताच्या वचनाची पूर्तता करण्यासाठी श्रीरामप्रभूंनी ही लीला केली ! धन्य ते परमतपस्वी आणि महातेजस्वी महर्षि गौतम अन् त्यांचा एकेक शब्द खरा करणारे धन्य ते प्रभु श्रीरामचंद्र !

(संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)