पहिल्या बाजीरावांनी छत्रसालाकडून मिळवलेले राज्य आणि मराठ्यांनी पानिपतच्या युद्धानंतर काढलेला वचपा !

‘शिवराज्याभिषेक आणि हिंदुसाम्राज्य विस्तार’ यांविषयी प्रसिद्ध होणारी लेखमाला !

१. निजामाकडून शाहू महाराजांना ‘महाराष्ट्राचे छत्रपती’ म्हणून मान्यता आणि कर चुकते करण्याचा करार

गोदावरीच्या काठावर बाजीरावांची आणि निजामाची गाठ पडली. निजामाशी लढाई टाळण्याची इच्छा असली, तरी बाजीरावाला युद्धासाठी हीच संधी हवी होती. पूर्वीप्रमाणे शत्रूला तोंड न देता, निसटून न जाता त्याने अत्यंत चातुर्याने हालचाली केल्या. मोगलांना आपल्या इच्छेप्रमाणे मालखेडजवळ येण्यास भाग पाडले. अत्यंत कौशल्याने युद्धाला तोंड देण्याचे त्याने टाळले. तितक्याच कौशल्याने त्याने आक्रमक युद्धाला आरंभ केला. लांब अंतराच्या बंदुका, जड तोफा असूनसुद्धा निजामाची पुरी कोंडी केली. पाठीशी लागलेल्या मराठी सैन्याच्या तावडीतून सुटणे अशक्य आहे, हे निजामाला कळून चुकले. ‘आपल्या सैन्याचा पूर्ण नाश तरी होईल, नाही तर बाजीराव जी आज्ञा करतील, ती आपल्याला मुकाट्याने मान्य करावी लागेल’, असा प्रसंग निजामावर आला. त्याने शाहू महाराजांना ‘महाराष्ट्राचे छत्रपती’ म्हणून मान्यता दिली. चौथाई, सरदेशमुखी यांचे सर्व येणे चुकते करून देण्याचा करार केला. (चौथाई आणि सरदेशमुखी, म्हणजे या दोन्ही मुख्यतः छत्रपतींच्या स्वराज्याबाहेर; पण राज्याच्या छायेखाली असलेल्या प्रदेशांतून वसूल करत. चौथाई दौलतीकडे, म्हणजे राज्याच्या खजिन्यात जमा होई, तर सरदेशमुखीची वसुली छत्रपतींच्या खासगी उत्पन्नाची गोष्ट होती.) आपल्या प्रांतातील कर गोळा करणार्‍या सर्व मराठी अधिकार्‍यांना पुन्हा कामावर घेण्याचे वचन दिले.

श्री. दुर्गेश परुळकर

२. बाजीरावांनी छत्रसाल राजाला साहाय्य करून त्यांचे राज्य त्यांना परत मिळवून देणे

मराठा मंडळाचे प्रमुख या नात्याने छत्रपती शिवराय यांच्या कार्याचा भाग बाजीरावांवर येऊन पडला होता, हे छत्रसालाने जाणले. त्याने बाजीरावांना एक पत्र लिहिले. या पत्रात छत्रसालाने पुराणातील कथानकाचा उल्लेख केला आहे. छत्रसाल बाजीरावांना लिहितो, ‘सर्व हिंदू एकमेकांचे बंधू आहेत आणि सर्व हिंदू जाती एक राष्ट्र आहे. अशी हिंदू मात्रांच्या अंतःकरणात प्रगाढ भावना उत्पन्न करण्याचे सामर्थ्य तुझ्यावाचून अन्य कुणातही नाही. पुराणकाळात विष्णूने जसे गजेंद्राला वाचवले, त्याचप्रमाणे दुष्ट शत्रूंच्या मगर मिठीतून मला तू मुक्त कर.’

एकेकाळचा छत्रपती शिवरायांचा मित्र आणि शिष्य असलेल्या छत्रसालाने मुसलमानांकडून गांजला गेल्यावर ‘मी हिंदु आणि तुम्ही हिंदू म्हणून मला साहाय्य करा’, असे बाजीरावांना सांगितले. बाजीराव लगेच मल्हारराव आणि पिलाजी जाधव यांना स्वतःसह घेऊन ७ लाख सैन्यासह कुठेही विश्रांती न घेता विजेच्या वेगात निघाले. वृद्ध हिंदू वीर छत्रसालाची आणि त्याची धामोरा येथे भेट झाली. तोपर्यंतच्या संग्रामातून वाचलेले बुंदेलखंडाचे सैन्य त्याने बरोबर घेतले. पावसाळ्याला आरंभ होऊन गेला होता, तरी आपले आक्रमण तसेच पुढे चालवले.

महंमद खान बंगश याने छत्रसालाच्या छोट्याशा हिंदु राज्यावर विजय संपादन केला होता. त्यामुळे तो अत्यंत खूश होता. पावसाळा संपेपर्यंत विश्रांती घेण्याच्या तो विचार करत होता. तेवढ्यात मराठ्यांनी त्याला जैतापूरला पूर्णपणे वेढले. त्याचा पुरता पराभव केला. स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी हिंदु विरांच्या हातात संपूर्ण माळवा बुंदेलखंड सोडून देऊन त्याला रणांगणातून पळून जावे लागले. त्यानंतर बुंदेलखंडाचा वृद्ध नरेश छत्रसाल आपल्या राजधानीत प्रवेश करता झाला. छत्रसालाने बाजीरावांना आपला तिसरा पुत्र मानले. हे नाते लक्षात ठेवून त्याने बुंदेलखंडाचा तिसरा भाग बाजीरावांच्या स्वाधीन केला.

३. मोगलांना गुजरात कधीच जिंकता न येणे

गुजरातमध्ये मराठीविरांचे शस्त्र आणि मुत्सद्यांचे डावपेच यांना अत्यंत महत्त्व होते. ते विजयावर विजय संपादन करत होते. पिलाजी गायकवाड, कंठाजी बांडे आणि शेवटी प्रत्यक्ष चिमाजी आप्पा यांनी गुजरातमधील मोगल सैन्याला भंडावून सोडले. त्यामुळे तिथल्या सुभेदाराला त्यांच्याशी लढावे लागले. अखेरीस त्याचा पराभव झाला. मराठ्यांना चौथाई आणि सरदेशमुखी देण्याचा करार त्याला करावा लागला. या महान हानीमुळे मोगल बादशाह प्रचंड संतापला. त्याने मराठ्यांना गुजरातमधून हाकलवून देण्यासाठी अभयसिंगाला हाताशी धरले. स्वतःचा स्वार्थ साधण्यासाठी या अभयसिंगाने एक डाव टाकला. मराठ्यांशी बोलणी करण्याच्या निमित्ताने त्याने पिलाजी गायकवाडला श्रीडाकोरजी क्षेत्री बोलावून घेतले. पिलाजी गायकवाड तिथे आल्यावर त्यांची विश्वासघाताने हत्या केली.  पिलाजी गायकवाडने आपल्या शौर्याने हिंदूंमध्ये आदराचे स्थान निर्माण केले होते. पिलाजीची हत्या झाल्यामुळे संतप्त झालेल्या मराठा सैन्याने बडोद्यावर आक्रमण करून बडोदा जिंकले. तेव्हापासून बडोदा मराठ्यांची राजधानी झाली. दामाजी गायकवाडने जोधपूरवर स्वारी केली. अभयसिंगाला त्याच्या वडिलोपार्जित राज्याच्या बचावासाठी त्वरेने जावे लागले. तो तिकडे गेलेला पहाताच दामाजी गायकवाडने कर्णावतीकडे स्वतःचा मोर्चा वळवला आणि कर्णावती जिंकून घेतली. अशा प्रकारे मराठ्यांनी मोगल सुभेदाराला गुजरातमध्ये येणे अशक्य केले. त्यामुळे तो संपूर्ण प्रांत मोगलांच्या साम्राज्यात कधीच समाविष्ट होऊ शकला नाही.

४. पानिपतमध्ये पुष्कळ हानी होऊनही उत्तर भारतात महत्त्वाच्या शहरांमध्ये मराठ्यांनी सत्ता स्थापन करणे

पानिपतात झालेली हानी भयंकर होती. सदाशिवराव भाऊ आणि त्यांच्या पाठीशी असलेले वीर मराठे राष्ट्राच्या रक्षणार्थ शत्रू सैन्याशी लढत असतांना मराठी सैन्यात पळापळ झाली. शत्रूचे सैन्य पाठलाग करू लागले. सहस्रो सैनिक शत्रूच्या हाती सापडले. दुसर्‍या दिवशी सकाळी त्यांना एका रांगेत उभे करण्यात आले. त्यानंतर सर्वांचा शिरच्छेद करण्यात आला. या अफगाणी शत्रूला प्रचंड लूट मिळाली. पठाणाने युद्ध जिंकले असले, तरी त्यांची मोठ्या प्रमाणात हानी झाली. अखेरच्या दिवशी मुसलमानांचे ४० सहस्र सैनिक रणांगणावर मारले गेले. अताईखान, उस्मान, गोविंदपंत बुंदेला यांचे मस्तक उडवले; पण त्याला आणि त्याच्या सैन्यातील शेकडो सेनानायकांना मराठ्यांनी ठार मारले. याचा नजीबखानला भयंकर राग आला.

पानिपताच्या समर भूमीवर एकत्र आलेले मराठे नाहीसे झाले, तथापि महाराष्ट्रातील मराठे अद्याप जिवंत होते. पानिपतच्या भयंकर दिवशी ज्यांच्या नात्याचे कुणी गेले नव्हते, असे घरच महाराष्ट्रात नव्हते. आपल्या राष्ट्रीय अपमानाचा प्रतिशोध घेण्यासाठी आणि आपल्या सैनिकांनी, सेनानायकांनी ज्या कार्यासाठी बलीदान दिले, ते कार्य यशस्वी करून त्यांचे हौतात्म्य व्यर्थ जाऊ नये; म्हणून स्वतः पंतप्रधान (पेशवे) नर्मदा नदी ओलांडून जाण्यास सिद्ध झाला.

राघोबादादाने मोगल बादशाहला गया आणि कुरुक्षेत्र ही पवित्र स्थाने मराठ्यांच्या स्वाधीन करायला भाग पाडले. मथुरा, वृंदावन, गडमुक्तेश्वर पुष्पवटी, पुष्कर इत्यादी हिंदूंची अनेक क्षेत्रे परत घेतली. काशीनगरीतही मराठ्यांच्या एका तुकडीने प्रवेश केला आणि ती जिंकून तिथे मराठ्यांची सत्ता स्थापन केली. राघोबादादाने अभिमानाने यवनांच्या हातून हिंदू राज्यातील सर्व महत्त्वाची नगरे आणि पवित्र क्षेत्रे सोडवून ती परत मिळवली आणि तसे पेशव्यांना लिहून कळवले. सहस्रो पवित्र स्मृतींच्या सहचर्याने प्रत्येक हिंदूंच्या अंतःकरणात आवडते स्थान असलेल्या आर्यावर्तातील या क्षेत्रावर आणि पुरीवर विजयाने  फडकणार्‍या हिंदु ध्वजाच्या योगाने हिंदू पदपादशाहीच्या विमोचनाच्या महत्कार्याला आणखी एक नैतिक समर्थन मिळते. मराठ्यांच्या होणार्‍या जयजयकारामुळे बादशाहच्या उरात धडकी भरली. त्याने होळकरांना ५० सहस्र सैनिक घेऊन येण्यासाठी बोलावले. मराठ्यांनी येऊन बादशाहच्या सेनेचा धुव्वा उडवला.

५. रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर भगवा झेंडा फडकवणे

रघुनाथरावांच्या नेतृत्वाखाली मराठ्यांचे एक वरिष्ठ सैन्य उत्तर हिंदुस्थानात पाठवून देण्यात आले. अब्दाली आगर्‍याच्या जवळ असतांना त्यालाही वार्ता कळली. अब्दाली हा एक अनुभवी कुशल सेनापती होता. त्याने त्याच्या आयुष्यात पराभवाचा अनुभव घेतला नव्हता. शत्रूकडून विरोधाची सिद्धता झाल्यावर पुढे पाऊल टाकणे, म्हणजे आत्मघात हे अब्दालीने ओळखले होते. पराभवाला आव्हान देण्याऐवजी जे हातात पडले, ते घालवायचे नाही, असा अब्दालीने विचार केला. मोगलांच्या सिंहासनावरचा स्वतःचा अधिकार बळकट करण्यासाठी त्याने मलकाज मानीच्या मुलीशी लग्न केले. सरहिंदच्या बचावासाठी १० सहस्र रक्षकांची तुकडी सिद्ध ठेवली. त्याचा मुलगा तैमूरशहाला लाहोरचा सुभेदार म्हणून नियुक्त केले. जेवढ्या वेगाने तो हिंदुस्थानात आला होता, तेवढ्याच वेगाने तो परत स्वदेशी निघून गेला.

दक्षिणेकडच्या कारभारात मराठ्यांना गुंतून रहावे लागत होते, तरीसुद्धा ते अत्यंत जलदगतीने अब्दालीने जे जे केले ते मोडून टाकत तेवढ्याच त्वेषाने आक्रमण करत राहिले. सखाराम भगवंत, गंगाधर यशवंत आणि इतर मराठे सेनानायक यांनी दुआबात प्रवेश केला.

मधल्या काळात मराठ्यांच्या विरुद्ध पठाण आणि रोहिले लढण्यासाठी सरसावले होते. मराठ्यांनी त्यांचा बीमोड केला. विठ्ठल शिवदेव हे देहलीवर चालून गेले. त्यांनी १५ दिवस निकराचा लढा दिला आणि राजधानी जिंकली. मराठ्यांचा सर्वांत मोठा वैरी आणि पठाणी गटाचा मुख्य नजीबखानला जिवंत पकडले. तिथून मराठे अब्दुल सय्यद याच्या नेतृत्वाखाली सरहिंद येथे ठेवलेल्या १० सहस्र सैनिकांशी लढण्यासाठी पुढे गेले. त्या सर्वांचा त्यांनी पराभव केला. त्यांच्या नायकाला बंदी बनवले. एवढे झाल्यावर सरळ लाहोरपर्यंत चालून जायचा मराठ्यांनी निश्चय केला. मराठे एका मागोमाग एक विजय मिळवत आहेत, हे पाहून अब्दालीच्या वतीने पंजाब आणि मुलतान येथे अधिकार चालवणारा अब्दालीचा सुभेदार अन् मुलगा तैमूरशाह घाबरून गेला. मराठ्यांशी लढण्याचे त्याला धैर्य झाले नाही. तो तिथून निघून गेला. रघुनाथराव यांनी लाहोरमध्ये प्रवेश केला. जहानखान आणि तैमूरशाह यांनी कौशल्याने अन् सुव्यवस्थित रितीने माघार घेण्याच्या प्रयत्न केला; पण मराठे अत्यंत वेगाने त्यांचा पाठलाग करत त्यांच्यापर्यंत पोचले. त्यामुळे त्यांची माघार पळपुटेपणा ठरला. मराठ्यांना चिरडून टाकण्याचा आणि हिंदुस्थानचे साम्राज्य जिंकण्याचा संकल्प त्याने केला होता; परंतु त्याला अपमानित होऊन जीवन वाचवण्यासाठी पळून जावे लागले. अखेरीस मराठ्यांनी हिंदुस्थानच्या उत्तर सीमेवर भगवा झेंडा फडकवला.

अशा प्रकारे समर्थ रामदासस्वामींनी आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी मराठ्यांमध्ये निर्माण केलेली विजिगीषु वृत्ती मराठ्यांना अटकेपर्यंत (अफगाणिस्तानपर्यंत) घेऊन गेली अन् तिथे त्यांनी भगवा विजयध्वज फडकवला.

(क्रमश: पुढच्या बुधवारी)

– श्री. दुर्गेश जयवंत परुळकर, हिंदुत्वनिष्ठ व्याख्याते आणि लेखक, डोंबिवली.