भगवंताने निर्माण केलेला काळ !
भगवंताने काळाची निर्मिती केली, युगांची निर्मिती केली. तो काळ आपल्याला ओळखता यावा, यासाठी त्याला विविध संज्ञाही दिल्या. पळे, घटिका, प्रहर, दिवस, रात्र, वर्ष, तप, युग, महायुग, मन्वंतर या आणि अशा संज्ञांमध्ये काळ मोजला जातो.
- युग : सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग हे एक-एक युग लक्षावधी वर्षांचे असते.
- महायुग (‘चतुर्युग’) : ४ युगे मिळून १ महायुग सिद्ध होते. त्याची एकूण वर्षे ४३ लाख २० सहस्र एवढी होतात.
- मन्वंतर : अशी ७१ महायुगे मिळून १ मन्वंतर सिद्ध होते.
- कल्प : अशी १४ मन्वंतरे म्हणजे एक कल्प. एक कल्प म्हणजे ब्रह्मदेवाचा एक दिवस आणि एक रात्र.
प्रत्येक मन्वंतराचे सप्तर्षी वेगळे !
प्रत्येक मन्वंतरामध्ये सप्तर्षी वेगळे असतात. १४ मन्वंतरांचे एकूण ९८ ऋषी मानले गेले आहेत, असा उल्लेख पुराणांमध्ये आढळतो. अंगिरस म्हणजे भृगू, अत्रि, क्रतू, पुलस्त्य, पुलह, मरिची आणि वसिष्ठ हे ‘स्वायंभुव’ नावाच्या पहिल्या मन्वंतरातले सप्तर्षी होते. सध्या चालू असलेले मन्वंतर हे ७ वे मन्वंतर आहे. ते ‘वैवस्वत’ मन्वंतर म्हणून ओळखले जाते. म्हणजे आता आपण सारे वैवस्वत मन्वंतरामध्ये आहोत. या वैवस्वत मन्वंतरामध्ये आपल्याला कोणते सप्तर्षी लाभले आहेत ? सप्तर्षी कोणत्या रूपात आपल्या सर्वांसाठी कृपावंत झाले आहेत ? या मन्वंतरातील सप्तर्षी आहेत, महर्षि कश्यप, अत्रि, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नि आणि भरद्वाज !
सप्तर्षींचे ७ गुण !
१. त्यांचे आयुष्य पुष्कळ प्रदीर्घ आहे.
२. त्यांनी मंत्रांना प्रगट केले आहे.
३. ते ऐश्वर्यसंपन्न आहेत.
४. भगवद्कृपेने त्यांना दिव्य दृष्टी प्राप्त झाली आहे.
५. ते गुण आणि विद्या यांनी युक्त आहेत.
६. ते धर्माची वृद्धी करण्यास सतत प्रयत्नरत असतात.
७. ते गोत्रांचे प्रवर्तक आहेत.
अशा ७ गुणांनी युक्त सप्तर्षी साक्षात् भगवंताचेच अंश आहेत. (संदर्भ : भक्तीसत्संग, सनातन संस्था)
सप्तर्षी : सृष्टीचे प्रथम पुरुष !
ब्रह्मदेवांनी सृष्टीनिर्मितीच्या वेळी सनक, सनंदन, सनातन, आणि सनत्कुमार या ४ निवृत्तीपरायण मुनींची उत्पत्ती केली. ते जन्मतःच निवृत्तीपरायण होते.
ब्रह्मदेवांच्या संकल्पाने त्यांचे देह आणि मन यांपासून आणखी १० पुत्रांची उत्पत्ति झाली. मरिची, अत्रि, अंगिरा, पुलस्त्य, पुलह, क्रतू, भृगू, वसिष्ठ, दक्ष आणि दहावे देवर्षी नारद ! यांनाच ब्रह्मदेवाचे ‘मानसपुत्र’ असे म्हणतात. त्या दहा पुत्रांपासून पुढे प्रजेची वाढ झाली. यातील काहींची वेगवेगळ्या मन्वंतरांमध्ये ‘सप्तर्षी’ म्हणून गणना झाली.
यातून लक्षात येते की, पृथ्वीवर जन्मलेल्या मनुष्याचे पूर्वज हे ऋषीच आहेत. त्यांच्यापासूनच मनुष्याचा जन्म झाला. कोणत्याही मनुष्याला त्याचे गोत्र विचारल्यास तो सप्तर्षींपैकी एका ऋषींचे नाव सांगतो. आपल्या सर्वांच्या निर्मितीमध्ये सप्तर्षींचे किती मोठे योगदान आहे ! ते नसते, तर आपण नसतो. आपले काही अस्तित्वच नसते.
यावरूनच आपल्या जीवनात त्यांचे किती महत्त्व आहे, ते लक्षात येते. अशा सप्तर्षींविषयी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती त्यांच्या प्रचंड उपकारांपुढे अंशमात्रही नाही. या सप्तर्षींप्रती आपल्याला अपार कृतज्ञता हवी !
सप्तर्षींचे कार्य !
७ ऋषींचा समूह प्रत्येक मन्वंतराशी निगडित असतो. मनु हे प्राचीन प्रशासकाचे पद आहे. प्रशासक म्हणजे येथे सृष्टीचालनात सुसूत्रता यावी, यासाठी नियमन करणारा. या प्रशासकाच्या साहाय्यासाठी देवतागण, इंद्र, अवतार, मनुपुत्र यांसह ७ ऋषीही असतात. सृष्टीचा विस्तार करणे, प्रजा उत्पन्न करणे, आपापल्या कुळांचा विस्तार करणे, हे सप्तर्षींचे कार्य असून या प्रजेचे पालन मनु, तसेच त्याचे पुत्र करतात.
भगवंताने सप्तर्षींची निर्मिती या सृष्टीचे संतुलन ठेवण्यासाठी केली आहे. धर्म आणि मर्यादा यांचे रक्षण करणे, विश्वातील सर्व कार्य योग्य पद्धतीने होण्याचे कार्य भगवंताने त्यांच्याकडे सोपवले आहे. सप्तर्षी त्यांच्या तपश्चर्येने विश्वात सुख-शांती कायम ठेवतात. प्रस्थापित करतात. ‘सप्तर्षी’ हे केवळ ऋषि नसून ते महर्षि आहेत. महर्षि म्हणजे श्रेष्ठ ऋषि ! हे सात महर्षी स्वतः अध्ययन करणे, करवून घेणे, यज्ञ करणे, करवून घेणे, दान घेणे आणि दान देणे, ही सहा कर्मे सतत करत असतात. सप्तर्षी ब्रह्मचर्याश्रमी लोकांना शिकवण्यासाठी घरात गुरुकुल चालवत. सत्ययुग आणि इतर सर्व युगांच्या आरंभी सर्व महर्षीगण वर्णाश्रम धर्माची व्यवस्था करत असत.
हे सातही महर्षी अत्यंत तेजस्वी आणि बुद्धीमान प्रजापती आहेत. ते प्रजेची उत्पत्ती करत असल्याने त्यांना ‘सप्त ब्रह्मा’ म्हटले गेले आहे.
सप्तर्षींना प्रलयातही जिवंत ठेवणारा मत्स्यावतार !
भगवान श्रीविष्णूचा प्रथम अवतार म्हणजे मत्स्य अवतार ! जेव्हा प्रलय आला, त्या वेळी सर्व काही नष्ट झाले. सर्वत्र पाणीच पाणी झाले होते. तिन्ही लोक त्या पाण्यात बुडून गेले. केवळ होते सप्तर्षी आणि सत्यव्रत मनु ! त्यांच्या रक्षणासाठी भगवंताने एक विशाल नौका पाठवली होती. सत्यव्रत मनु आणि सप्तर्षी यांच्याकडेच निर्मितीचे सर्व बीज होते. प्राणी, पक्षी, वनस्पती, धान्य अशा प्रकारे भगवंताच्या निर्मितीतील प्रत्येक घटकाचे बीज त्यांच्याकडे होते. साक्षात् भगवंताच्या विशाल मत्स्यावताराने सप्तर्षी आणि मनु यांना संपूर्ण प्रलयकाळात त्या विशाल नौकेतून विहार करवला आणि त्यांचे रक्षण केले. प्रलय संपल्यानंतर त्याच निर्मितीच्या बीजांच्या आधारे सप्तर्षी आणि मनु यांनी पुन्हा सृष्टीचा विस्तार केला.